धामणे येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्यावतीने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा उद्घाटन समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला.
71 व्या प्रजासत्ताक दिनी रविवारी धामणे येथील छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान धामणे प्रमुख बंडू केरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर अशोक जायण्णाचे, उद्योगपती अमर अकनोजी, धामणे ग्रामपंचायत अध्यक्ष सौ करेव्वा नाईक, उपाध्यक्षा गीता दत्तात्रय येळ्ळूरकर आणि प्रा. डाॅ. विनोद गायकवाड उपस्थित होते. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी गायिलेल्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपतींच्या पुतळ्याला अभिषेक घालून विधिवत पूजन करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुणे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर अशोक जायण्णाचे यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे उद्योगपती अमर अकणोजी यांच्या हस्ते ध्वज पूजन झाले.
याप्रसंगी प्रा. डाॅ. विनोद गायकवाड यांचे समयोचित भाषण झाले. छत्रपती शिवाजी महाराज एक कर्तुत्ववान योद्धे होते. मुघल साम्राज्याविरुद्ध दंड थोपटून मान न चुकवता मुठभर मावळ्यांना हाताशी घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवरायांचे चरित्र समजून घेतल्याशिवाय हिंदुस्थानचा इतिहास समजून घेता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. 17 व्या शतकातील शिवाजी महाराजांचा लढा हा आपल्या संस्कृतीच्या संरक्षणासाठी होता, असे प्रा. गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले.
सवाद्य संपन्न झालेल्या सदर उद्घाटन समारंभास निमंत्रित पाहुण्यांसह श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान धामणेचे पदाधिकारी, सदस्य आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. उद्घाटनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चौथऱ्याचा परिसर रंगबिरंगी फुलांनी सुशोभित करण्यात आला होता. पुतळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर घालण्यात आलेल्या फुलांच्या आकर्षक रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.