आगामी राज्य मंत्रिमंडळ विस्तारात नव्या आमदारांसह ज्येष्ठ अनुभवी आमदारांना संधी दिली गेली नाही तर राज्यातील येडीयुरप्पा यांचे सरकार मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अननुभवी नेत्यांना यापूर्वी उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आल्यामुळे आधीच नाराज असलेल्या आमदार उमेश कत्ती, मुरुगेश निराणी यांच्यासह काही असंतुष्ट भाजप आमदारांनी पक्षाला गंभीर इशारा दिला असून आगामी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्याला स्थान मिळणार की नाही? याची ते वाट पाहत आहेत. कांही ज्येष्ठ असंतुष्ट भाजप नेतेतर सध्या डि. के. शिवकुमार यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्याचप्रमाणे कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी शिवकुमार यांची नियुक्ती झाल्यास असंतुष्टांपैकी कांहीजण एका पायावर काँग्रेसमध्ये जाण्यास तयार आहेत. मात्र असंतुष्ट भाजप आमदारांपैकी एकानेही अद्याप याबाबत जाहीर वाच्यता केलेली नसली तरी सर्वजण सध्या पर्याय शोधू लागले असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. कांही महिन्यापूर्वी डी. के. शिवकुमार यांनी सुमारे 20 भाजप आमदार काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचे सांगितले होते.
दरम्यान आमदार उमेश कत्ती यांनी अनुभवी आणि सक्षम नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन उपमुख्यमंत्री बनवले असते तर माझा काही आक्षेप नव्हता असे सांगून मी यापूर्वी संमिश्र मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे सध्याच्या मंत्रिमंडळात हक्काने मंत्रीपद मागू शकतो तथापि माझ्यासारखे इतर लायक आमदारही आहेत त्यांनाही त्यांचा हक्क मिळाला पाहिजे असे कत्ती यांनी स्पष्ट केले.
येत्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळावे यासाठी कत्ती व मुरुगेश निराणी यांनी लॉबिंग सुरू केले असून भाजपवर दबाव टाकण्यास प्रारंभ केला आहे. उमेश कत्ती यांनी नुकतीच सलग तीन-चार दिवस बेंगलोर मुक्कामी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली आहे.
अलीकडेच लिंगायत समाजाची गुरु श्री वचनानंद यांनी आमदार मुरुगेश निराणी यांना आपला संपूर्ण पाठिंबा दर्शवत एका कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना इशारा दिला की जर निराणी यांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेले नाही तर पंचमसाली लिंगायत समाज जो निराणी यांचा समाज आहे तो समाज बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर बहिष्कार टाकेल. श्रींच्या या जाहीर धमकीला येडियुरप्पा यांनी जेंव्हा आक्षेप घेतला तेंव्हा त्या ठिकाणी असलेल्या मुरुगेश निराणी यांनी चकार शब्द काढला नाही. या कार्यक्रमास गृहमंत्री बोम्माई व इतर नेतेमंडळी उपस्थित होती. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी मंत्रिमंडळ विस्ताराप्रसंगी नव्या आमदारांसह असंतुष्ट ज्येष्ठ अनुभवी आमदारांना मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा कसे हाताळतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, रमेश जारकीहोळी यांनी आपले मित्र अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी यांच्यासाठी लॉबिंग सुरू केले आहे. यापूर्वी दीर्घ कालावधीपर्यंत चाललेल्या ‘ऑपरेशन कमळ’प्रसंगी कुमठळ्ळी हे रमेश जारकीहोळी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. त्यामुळे आता महेश कुमठळ्ळी यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी जारकीहोळी पक्षावर दबाव आणत आहेत. पक्षाकडून महेश कुमठळ्ळी यांची एखाद्या मंडळावर अथवा निगमवर नियुक्ती केली जाणार असली तरी बेळगावच्या सहकार क्षेत्रावरील उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी कुमठळ्ळी यांना सहकार क्षेत्र मिळावे, अशी रमेश जारकीहोळी यांची इच्छा आहे.