फक्त फाउंड्री हायड्रॉलिक्स हेलमेट्स यामध्येच नाहीतर आता प्रिंटिंग व पॅकेजिंग क्षेत्रातही बेळगाव देशात अग्रभागी असून यारबल प्रिंट- पॅक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हे सिद्ध केले आहे.
बेळगावच्या यारबल प्रिंट – पॅक प्रा. लि. कंपनीने प्रिंटिंग अँड पॅकेजिंगमधील सर्वोत्तम कंपनीसाठी असणारा नॅशनल एक्सलन्सी अवॉर्ड हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार पटकाविला आहे. यारबल प्रिंट – पॅक प्रा. लि. कंपनीचे प्रमोटर अर्थात मुख्य प्रवर्तक अजीत जी. पाटील हे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 1986 मध्ये बेळगाव (उद्यमबाग) येथे दर्जेदार छपाईसाठी सुप्रसिद्ध असलेली यारबल ऑफसेट प्रिंटिंग प्रेस सुरू झाली. कालांतराने लिंगराज महाविद्यालयातून पदवीधर झालेल्या झालेल्या पाटील यांचा मुलगा अमेय अजित पाटील यांनी 2008 मध्ये वडिलांच्या साथीने आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केली त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली यारबल ऑफसेट प्रिंटिंग प्रेसच्या रोपट्याचे कालांतराने यारबल प्रिंट – पॅक प्रा. लि. या वटवृक्षात रूपांतर झाले. तेंव्हा या कंपनीने आपल्या व्यावसायिक प्रिंटिंगचे काम थांबून आईस्क्रीम आणि फुट इंडस्ट्रीच्या पॅकेजिंग क्षेत्रावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले.
तत्पर आणि दर्जेदार कामाच्या जोरावर त्यानंतर हळुहळू या कंपनीने कर्नाटकसह महाराष्ट्र व गोवा राज्यातील फूड पॅकेजिंगची प्रमुख बाजारपेठ काबीज करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुढे अल्पावधीत फूड इंडस्ट्री पॅकेजिंग क्षेत्रातील एक विश्वासार्ह मोठी कंपनी म्हणून यारबल प्रिंट – पॅक प्रा. लि. कंपनीने मानाचे अव्वल स्थान प्राप्त केले.
सध्या या कंपनीला जो राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे तो आईस्क्रीम मेट-पेट / मेटलाईज्ड कोंबी कार्टोन्ससाठी आहे आम्ही अमेय अजित पाटील यांनी या कार्टोन्समधील मेटलाइफ इफेक्ट तयार केला असून असा इफेक्ट देशात पहिल्यांदाच तयार केला गेला आहे. आपल्या कामाचा अत्युत्तम दर्जा आधुनिक पायाभूत सुविधा यामुळेच ‘यारबल’ आता प्रिंटिंग व पॅकेजिंग क्षेत्रातील एक आद्य कंपनी बनली आहे.
उपरोक्त राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्याच्या शर्यतीमध्ये देशातील एकूण 1500 कंपन्यांमध्ये स्पर्धा होती. भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य आणि औद्योगिक मंत्रालयाच्या सहकार्याने ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मास्टर प्रिंटर असोसिएशन (एआयएफएमए) यांच्यातर्फे आयोजित शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात यारबल प्रिंट – पॅक प्रा. लि. कंपनीच्या अजित पाटील यांना प्रतिष्ठेचा नॅशनल एक्सलन्स अवार्ड पुरस्कार प्रदान केला गेला मुंबई येथील द वेस्टइन गार्डन सिटी हॉटेल येथे गेल्या 8 जानेवारी 2020 रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.