बेळगावचा होतकरू क्रिकेटपटू सुजय सातेरी आणि व्ही. व्याशक त्यांच्या फलंदाजीच्या जोरावर कर्नल सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेतील सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कर्नाटक संघाला प्रतिस्पर्धी आंध्रप्रदेश संघाविरुद्ध दिवस अखेर 8 बाद 238 अशी धावसंख्या उभारता आली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या मान्यतेने बेळगावातील केएससीए स्टेडियमवर प्रतिष्ठेच्या कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेतील कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या 23 वर्षाखालील संघांचा चार दिवसीय सामना खेळविला जात आहे. सदर सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून कर्नाटक संघाने आंध्र प्रदेश संघाला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिल्यानंतर रविवारी आंध्र संघाचा पहिला डाव 281 धावांमध्ये संपुष्टात आला होता.
प्रत्युत्तरादाखल फलंदाजी करणाऱ्या कर्नाटक संघाने काल सायंकाळपासून आज सोमवारी दिवसभरात 88 षटकांमध्ये आपले 8 गडी गमावून 238 धावा काढल्या. सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी आंध्र प्रमाणे कर्नाटक संघाचा डाव देखील धाव फलकावर 21 धावा असताना कोसळला. तथापि सुजय सातेरी याने संयमी फलंदाजी करत 146 चेंडूत अर्धशतकासह 69 धावा काढून संघाचा डाव सावरला. त्याचप्रमाणे अंकित उडुपा (130चेंडूत40धावा) आणि व्ही. व्याशक (40 चेंडूत नाबाद 68 धावा) यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला समाधानकारक स्थितीत नेऊन ठेवले. या तिघांनी व्यतिरिक्त कर्नाटक संघातील शिवकुमार(11) आणि लुनीत शिसोदिया(15) यांनाच काही ती दुहेरी धावसंख्या गाठता आली. परिणामी प्रति षटक 2.7 धावा अशा गतीने दिवस अखेर कर्नाटक संघाला 88 षटकात 238 धावाचा टप्पा गाठता काढता आला. सोमवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला, त्यावेळी कर्नाटकचा व्हि. व्याशक नाबाद 68 धावांवर आणि अब्दुल हसन खलिद नाबाद 32 धावांवर खेळत होता.
आंध्रप्रदेश संघातर्फे पी.पी. मनोहर याने सर्वात यशस्वी गोलंदाजी करताना 15 षटकात 47 धावा देऊन 3 गडी बाद केले. त्याला साथ देताना प्रणयकुमार याने 39 धावात 2, गिरीनाथ रेड्डी याने 47 धावा 2 आणि विनू विनुकोंडा याने 31 धावात 1 गडी बाद केला.