सध्या सर्वत्र प्लास्टिक बंदीची मोहीम राबविली जात असल्यामुळे कापडी पिशव्यांना महत्त्व प्राप्त झाल्यामुळे हिंडलगा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने कारागृहातच कापडी पिशव्या निर्मीतीचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
काळाची गरज लक्षात घेऊन विविध महिला आणि स्वयंसेवी संघटना कापडी पिशव्या शिवून देण्याचे कंत्राट घेत आहेत. हिंडलगा मध्यवर्ती कारागृह प्रशासनानेही शिक्षा भोगत असतानाच कैद्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कापडी पिशव्या शिवुन देण्याचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कारागृहाने शिलाई मशीन्स उपलब्ध केली असून 50 जणांना शिलाईचे काम देण्यात येणार आहे. सध्या कारागृह अधिकारी आणि कैद्यांचे पोशाख कैदी स्वतःचं शिवतात, याचाच पुढील भाग म्हणून कापडी पिशव्या शिवण्याचा उपक्रम सुरू होणार आहे. यासाठी कैद्यांना कापड उपलब्ध करून देण्यासाठी इचलकरंजीच्या बी व्ही पाटील टेक्स्टाईल समवेत कारागृह अधिकारी अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे.
कापडी पिशव्या शिवण्यासाठी लागणारा कच्चामाल कंपनी पुरवणार असून विक्री व्यवस्थापनासह पिशव्यांचा दरही कंपनीच निश्चित करणार आहे. शिंपी कैद्यांना त्यांचा पगारही कंपनीकडूनच दिला जाणार आहे. हिंडलगा कारागृहात शिवलेल्या पिशव्या पर्यावरण पूरक असणार असून त्या बनविण्यासाठी कारागृहात विव्हींग मशीन आणि 37 आधुनिक मशीन्स उपलब्ध करण्यात आली आहेत. कांही वर्षांपूर्वी हिंडलगा कारागृहांमध्ये जमखाना व लाकडी वस्तू तयार करण्याचे उद्योग सुरू करण्यात आले होते.