वेतनवाढ, बँकेचे साप्ताहिक कामकाज पांच दिवस ठेवण्याच्या मागणीसह अन्य कांही मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनसह (यूएफबीयू) विविध बँक संघटनांनी आज शुक्रवारी आंदोलन छेडून भव्य मोर्चा काढला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनसह (यूएफबीयू) विविध बँक संघटनांनी सादर केलेल्या निवेदनाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकांनी स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. भारतीय बँक संघटनेकडून वेतन वाढीवर योग्य निर्णय घेतला जात नाही. मे 2018 मध्ये दोन टक्के पगार वाढीची ऑफर दिली होती. त्यानंतर केंद्र सरकारने 15 टक्के वाढ घोषित केली. मात्र महागाई आणि कामाचा ताण पाहता ही वाढ मान्य केली नसून 20 टक्के वेतनवाढीच्या मागणीवर संघटना ठाम आहे. साप्ताहिक पाच दिवस बँकांचे व्यवहार सुरू असावेत, 20 टक्के वेतनवाढ मिळावी, बेसिक पे मध्ये स्पेशल अलावून्स समाविष्ट करावा, नवीन पेन्शन स्कीम (एनपीएस) रद्द करावी, पेन्शन योजनेत बदल करावेत, फॅमिली पेन्शनमध्ये वाढ करावी, निवृत्ती लाभला इन्कम टॅक्समधून सवलत द्यावी आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत. आपल्या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर येत्या 11 ते 13 मार्च या कालावधीत पुन्हा आंदोलन छेडले जाईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन सादर करतेवेळी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने एकनाथ गिंडे, फ्रान्सिस फर्नांडिस, शरद करगुप्पीकर, विनोदकुमार आदींसह विविध बँक संघटनांचे पदाधिकारी आणि बहुसंख्य बँक कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी बँक कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडल्यामुळे आज शुक्रवारपासून तीन दिवस बँका बंद राहणार आहेत.
दरम्यान, आज सकाळी धर्मवीर संभाजी चौक येथून बँक कर्मचाऱ्यांनी भव्य मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व एकनाथ गिंडे, फ्रान्सिस फर्नांडिस, शरद करगुप्पीकर, अच्युत, नारायण कारवी, विनोदकुमार, सुधीर चिकोडी, लक्ष्मीनारायण व संपदा हावळ यांनी केले. धर्मवीर संभाजी चौकातून निघालेला हा मोर्चा किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, खडेबाजार, गणपत गल्लीमार्गे सिंडिकेट बँक मारुती गेल्ली येथे समाप्त झाला. मोर्चादरम्यान मोर्चात सहभागी विविध मागण्यांचे फलक हातात धरलेले बँक कर्मचारी घोषणाबाजी करून सार्यांचे लक्ष वेधून घेत होते.