कर्नाटक नवनिर्माण सेनेवर बंदी घालण्यात यावी व त्याचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांच्यावर भाषिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच सादर करण्यात आले.
महाराष्ट्र एकीकरण समिती बिदर जिल्हा अध्यक्ष रामराव राठोड- बोंथीकर आणि सचिव पृथ्वीराज अशोकराव पाटील- एकबेकर यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवेदन स्वीकारण्यात येऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले. म. ए. समिती जिल्हा बिदरच्यावतीने कर्नाटक नवनिर्माण सेना आणि त्यांचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घालण्याच्या वक्तव्याचा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या प्रतिकृतीचे पोलीस बंदोबस्तात दहन करण्याच्या कृतीचा निषेध करण्यात येत आहे. यासाठी कर्नाटक नवनिर्माण सेनेवर बंदी घालण्यात यावी व त्यांचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांच्यावर भाषिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी बिदर जिल्हा समितीचे उपाध्यक्ष नारायण पाटील- भंडारकुमठेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री कर्नाटक, मुख्यमंत्री महाराष्ट्र, अध्यक्ष मध्यवर्ती म. ए. समिती बेळगाव आणि तहसीलदार (ता. औराद) यांना धाडण्यात आले आहे.
दरम्यान गेल्या 29 डिसेंबर 2019 रोजी बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कर्नाटक नवनिर्माण सेनेवर बंदी घालण्यात यावी व त्यांचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांच्यावर भाषिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल केला जावा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या प्रतिमेचे पोलीस बंदोबस्तात दहन करण्याच्या कृतीचा निषेध हे ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले होते. बैठकीस बिदर म. ए. समितीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.