12 एकर जमिनीच्या वादातून दोडवाड (ता. बैलहोंगल) येथे एकाच कुटुंबातील तिघाजणांचा भीषण खून करण्यात आल्याप्रकरणी पोलिसांनी आज गुरुवारी 4 जणांना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले.
शिवप्पा बसप्पा भगवंतनावर, गोविंद संगोळ्ळी, मल्लिकार्जुन अंदानशेट्टी व बसवंत अंदानशेट्टी अशी आरोपींची नावे आहेत. दोडवाड येथे एकाच कुटुंबातील तिघांचा भीषण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना गेल्या शनिवारी उघडकीस आली. मारेकऱ्यांनी माजी ता. पं. सदस्य शिवानंद अंदानशेट्टी (वय 60), त्यांची पत्नी शांताव्वा (वय 40) आणि मुलगा विनोद (वय 26) या तिघांचा त्यांच्या राहत्या घरात घुसून तीक्ष्ण हत्यार व रॉडने वार करून निर्घण खून केला. रात्री झोपलेले असताना अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अंदानशेट्टी कुटुंबाला प्रतिकार अथवा बचाव करण्याची संधीच मिळाली नाही, परिणामी तिघांचा जागीच मृत्यू झाला. मयत विनोद याचा येत्या 30 जानेवारी रोजी विवाह होणार होता, मात्र तत्पूर्वी त्याचा खून झाला.
मिळालेल्या माहितीनुसार हत्येच्या दिवशी मुख्य आरोपी शिवप्पा भगवंतनावर व विनोद अंदानशेट्टी रात्री एकत्र जेवून झोपी गेले. त्यानंतर ट्रॅक्टर ट्रेलरच्या लोखंडी रॉडने प्रथम विनोदला ठार मारले, त्यानंतर शेजारी झोपलेल्या शिवानंद व शांत व या पती पत्नीची हत्या केली.
शिवानंद व त्याची पहिली पत्नी कस्तुरी यांना मुलबाळ नव्हते. त्यामुळे त्यांनी शिवप्पाला आपला मुलगा म्हणून वाढविले होते. विनोद हा शिवानंदची दुसरी पत्नी शांताबाई हिचा मुलगा होता. त्यामुळे 12 एकर जमिनी आपल्याला मिळणार नाही या व्देषापोटी शिवप्पाने संपूर्ण अंदानशेट्टी कुटुंबाची हत्या केली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.