व्यवसायात प्रगती व्हायची असेल तर तुमचे आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे आहे स्वतःसाठी वेळ देणे गरजेचे आहे, असा सल्ला लता कित्तूर यांनी महिलांना दिला.
अविष्कार महिला उद्योजक संस्थेचा 22 वा वर्धापन दिन आज बुधवारी सायंकाळी वरेरकर नाट्य संघाच्या सभागृहात उत्साहात पार पडला, त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा मनीषा बदाने या होत्या. प्रारंभी त्यांनी सर्वांचे स्वागत केले व पाहुण्यांचा सत्कार केला. तसेच महिला रत्न व कॉम्रेड अरुणा असफ अली पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार मनीषा सुभेदार यांचा लता कित्तूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मनीषा सुभेदार यांनी सत्कार याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच बेळगावमधील महिला परस्पर सहकार्याने अनेक उपक्रम राबवत आहेत. त्यामुळे स्त्री ही स्त्रीची शत्रू आहे हा समज खोडून काढला पाहिजे, असे सांगून तरुण भारतबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
प्रमुख पाहुण्या लता कित्तूर यांनी आपल्या समयोचीत भाषणात स्वतःला वेळ देण्याबरोबरच विविध छंद जोपासण्याचे आवाहन केले. आग्रही राहणे थांबवा आणि केलेच पाहिजे, झालेच पाहिजे ही भाषा शक्यतो वापरू नका असे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी उषाताई गुप्ते उद्योगिनी पुरस्कार सुनिता पाटणकर यांना तर अविष्कार उद्योगिनी पुरस्कार संजयदादा सामंत यांना देण्यात आला. या दोघींनी आपले मनोगत व्यक्त करताना बेळगावकरांनी दिलेला प्रतिसाद कुटुंबियांचे प्रोत्साहन आणि सहकारीवर्गाचे सहकार्य यामुळेच आपण प्रगती करू शकलो असे सांगितले.
यानिमित्ताने उपवासाची थाळी तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली, तसेच विषय निवडून एक मिनिटात बोलण्याची स्पर्धाही झाली. यावेळी शितल गोगले व संगीता परिहार यांनी नृत्य सादर केले. हिमांगी प्रभू यांनी अहवाल वाचन केले. कार्यक्रमास महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अपर्णा सामंत यांनी केले.