सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे अग्रगण्य व्यासपीठ असा लौकिक असलेल्या गुंफण अकादमीच्या वतीने देण्यात येणाऱ्या साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, सद्भावना तसेच गुणगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये प्रा. डॉ. सुनंदा शेळके, विजय उत्तुरे, प्रा. डॉ. आनंद मेणसे, चंद्रकांत जोगदंड, प्रा. डॉ. नीता तोरणे यांचा समावेश असल्याची माहिती अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी दिली.
जयसिंगपूर येथील प्रसिध्द कवयित्री व गझलकार प्रा. डॉ. सुनंदा शेळके यांची गुंफण साहित्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. चंद्रकवडसे, ही आरसपानी स्वप्ने, ऋतुबिंब या त्यांच्या साहित्यकृती विशेष गाजल्या आहेत. यासोबतच त्यांनी समीक्षात्मक, ललित, अनुवाद अशा स्वरूपाचे विपूल लेखन केले आहे. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात रचनात्मक काम करत असलेले पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय उत्तुरे यांना गुंफण सामाजिक पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षण – क्रीडा संस्थांच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थी, शिक्षक, खेळाडू घडवण्यात त्यांनी योगदान दिले आहे.
बेळगाव येथील नामवंत वक्ते स्तंभलेखक व विचारवंत प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांची गुंफण सांस्कृतिक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. विद्यार्थी दशेतच त्यांनी सामाजिक व राजकीय चळवळीत झोवूâन दिले. ‘कर्जमुक्तीसाठी कर्ज’ ही चळवळ तब्बल दोन दशकांपर्यंत चालवून त्यांनी जवळपास दोन हजार गरीब कुटुंबांना न्याय मिळवून दिला आहे. विविध अभ्यासपूर्ण पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. हडपसर (पुणे) येथील कवी चंद्रकांत जोगदंड यांना गुंफण सद्भावना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कवी, लेखक, पटकथा लेखक, दिग्दर्शक म्हणून त्यांचा लौकिक आहे. विविध संस्था, संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून काम करताना समाजात सद्भाव वाढीस लागावा यासाठी त्यांनी योगदान दिले आहे.
मराठी भाषा व गोव्याच्या संस्कृतीवर निर्व्याज प्रेम करणाऱ्या सर्जनशील कवयित्री प्रा. डॉ. नीता तोरणे यांना गुंफण गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. एक ओळ कवितेची, जगताना, क्वेस्ट फॉर न्यू लाईफ, पुन्हा एकदा यासारखे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिध्द आहेत.
त्यांच्या साहित्याचे इंग्रजी, कोकणी, कन्नड तसेच हिंदी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. महाराष्ट्र तसेच गोव्यातील महाविद्यांलयांमध्ये आयोजित चर्चासत्रात त्यांनी सादर केलेले शोधनिबंध लक्षवेधी ठरले आहेत. १२ जानेवारी रोजी इदलहोंड (जि. बेळगाव) येथे होत असलेल्या १७ व्या गुंफण सद्भावना साहित्य मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, असे डॉ. चेणगे यांनी सांगितले.