मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या बँकिंग आणि आर्थिक सेवा कायदा परिषदेमध्ये बेळगावचे नामवंत वकील अॅड. सचिन बिच्चू यांना ‘बेस्ट अॅडव्होकेट’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.
मुंबई येथे अलीकडेच बँकिंग आणि आर्थिक सेवा कायदा परिषदेचे (बँकिंग अॅन्ड फिनान्शियल सर्विसेस लीगल समीट) आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे औचित्य साधून राष्ट्रीयकृत तसेच खाजगी बँका आणि आर्थिक संस्थांना कायदेशीर सल्ला देणाऱ्या कायदेतज्ज्ञांना बेस्ट अॅडव्होकेट, बेस्ट इन हाऊस कौन्सिल, बेस्ट लीगल टीम आदी विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वैयक्तिक तपशील (बायोडेटा) आणि बँका व आर्थिक संस्थांच्या शिफारसी या निकषावर हे पुरस्कार प्रदान केले गेले.
सदर समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे इंडिया इन्फोलाइनचे मुख्य भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिकारी आणि कायदा विभाग प्रमुख रोहित सालवान यांच्या हस्ते बेळगावचे सुप्रसिद्ध वकील अॅड. सचिन बिच्चू यांना ‘बेस्ट अॅडव्होकेट’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अॅड. सचिन बिच्चू हे बेळगावसह बेंगलोर येथील अनेक नामवंत बँका व आर्थिक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहतात. राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराच्या तोडीचा ‘बेस्ट ॲडव्होकेट’ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अॅड. सचिन बिच्चू यांचे सध्या सर्वत्र अभिनंदन होत आहे.
देशभरातील राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांच्या ज्येष्ठ कायदा सल्लागारांनी मुंबई येथे झालेल्या बँकिंग आणि आर्थिक सेवा कायदा परिषदेचे आयोजन केले होते. परिषदेस देशभरातील ज्येष्ठ नामवंत कायदा सल्लागारांसह बिर्ला आणि रिलायन्स सारख्या खाजगी भांडवल गुंतवणूकदार उद्योग समूहाचे अधिकारीदेखील उपस्थित होते. परिषदेमध्ये बँका व आर्थिक संस्थांची दिवाळखोरी, दिवाळखोरीवरील उपाययोजना, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचा वापर, डॉक्युमेंटेशनचे महत्व आदी विविध विषय ज्येष्ठ वकील आणि विषय तज्ज्ञांकडून मांडले गेले. तसेच या विषयावर सांगोपांग चर्चा करण्यात आली.