प्रांताधिकारी कार्यालयावर जप्ती!
शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई वसुलीसाठी कारवाई
सांबरा विमानतळ विस्तारासाठी संपादन करण्यात आल्या शेतजमिनीची थकित नुकसान भरपाई देण्यास दिरंगाई करणाऱ्या प्रांताधिकारी कार्यालयातील कारगाडीसह अन्य साहित्य आज शनिवारी न्यायालयाच्या आदेशावरून जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 2006 साली सांबरा विमानतळाच्या विस्तारासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी योग्य नुकसान भरपाई देण्याच्या अटीवर शासनाकडून संपादित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार भूसंपादनानंतर राज्य सरकारने नुकसान भरपाईची अर्धी 50% रक्कम संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ दिली. त्यानंतर नुकसानभरपाईची उर्वरित सुमारे 19 कोटी रुपये इतकी थकीत रक्कम देण्यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी आदेश काढला होता. सांबरा विमानतळाच्या विस्तारीकरणात जमिनी गेल्यामुळे अनेक शेतकरी रस्त्यावर आले आहेत. संबंधित शेतजमिनी व्यतिरिक्त त्यांच्याकडे उपजीविकेचे दुसरे साधन नव्हते. शेतजमीन नाही, नोकरी नाही, यामुळे संबंधित शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे, ही वस्तुस्थिती असताना गेल्या दोन वर्षापासून या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात टाळाटाळ केली जात होती
अखेर वारंवार मागणी करूनही नुकसान भरपाई देण्यासंदर्भात प्रांताधिकारी कार्यालयाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने संबंधित शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने नुकताच शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देताना नुकसान भरपाईची रक्कम वसूल करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचा आदेश दिला. त्यानुसार शनिवारी बेलीफांच्या समक्ष आज शनिवारी बेळगाव प्रांताधिकारी कार्यालयातील कारगाडीसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
दरम्यान, याप्रसंगी उपस्थित शेतकरी प्रांताधिकार्यांना भेट घेण्यास गेले असता त्यांना एका सभागृहात प्रांताधिकारी येत आहेत असे सांगून बसविण्यात आले. तथापि प्रांताधिकार्यांनी मात्र तातडीची बैठक असल्याची सबब पुढे करून घटनास्थळावरून काढता पाय घेतला. प्रांताधिकाऱ्यांच्या या पळपुट्या कृतीमुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.