आता म. ए. समितीच्या नेतेमंडळींनी स्वतः कारभारी बनवून युवकांना सीमा लढायचे सरदार बनवण्याची वेळ आली आहे, असे परखड मत समितीचे ज्येष्ठ नेते दीपक पावशे यांनी व्यक्त केले.
विधानसभेच्या निवडणूकीनंतर आपला विजयोत्सव साजरा करणाऱ्या रमेश जारकीहोळी यांनी बेळगाव ग्रामीणमध्ये मराठी भाषिकांचे प्राबल्य आहे, असे जे जाहीर वक्तव्य केले त्या अनुषंगाने दीपक पावशे बोलत होते.
प्रसारमाध्यमांशी बोलताना पावशे म्हणाले की, रमेश जारकीहोळी यांनी आपला विजयोत्सव साजरा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बेळगाव ग्रामीणमध्ये मराठी भाषिकांचे प्राबल्य असल्याची स्पष्ट जाहिर कबुली दिली आहे. जर जारकीहोळीं सारखा एक कट्टर कन्नड भाषिक नेता बेळगाव ग्रामीणमधील मराठी भाषिकांचे प्राबल्य मान्य करत असेल तर या मराठी भाषिकांनी गेल्या 15 वर्षात आपण आपली ताकद का दाखवली नाही? याचा विचार केला पाहिजे.
सध्या यासाठी गावोगावी समितीची पुनर्रचना सुरू आहे. या पुनर्रचनेमध्ये युवकांना संधी दिली गेली पाहिजे. कारण यापुढे युवकच समितीचे चालक राहतील. म. ए. समितीचे जे जे नेते असतील त्यांनी आता फक्त कारभाऱ्याची भूमिका बजावावी आणि नवीन सरदार तयार करून सीमालढा जिवंत ठेवावा. मातृभाषा मराठी जिवंत ठेवावी.
खरेतर कार्यकर्त्यांना एकी हवी आहे, परंतु नेते मंडळींमधील भांडणे संपलेली नाहीत. याचा अर्थ समिती नेत्यांना एकी नको आहे असा होतो. त्यासाठीच आता कार्यकर्त्यांनी संघटित होऊन आपली मराठी भाषा कशी जतन केली जाईल याचा विचार केला पाहिजे. तसेच आपला समाज कसा संघटित राहील याचा प्रत्येक मराठी भाषिकाने विचार केला पाहिजे, असे प्रांजळ मतही समिती नेते दीपक पावशे यांनी व्यक्त केले.