चालत्या बसमधून पडून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना धर्मवीर संभाजी चौक येथे ते मंगळवारी सकाळी घडली. सुदैवाने महिलेच्या हातातील बालकाला कोणतीही इजा झाली नाही.
सुमन मरियप्पा दबाले (वय 45) असे अपघातातील जखमी महिलेचे नाव आहे. चालत्या बसमधून रस्त्यावर पडलेल्या सुमनच्या हातात तिचे दोन महिन्याचे बालक होते. मात्र खाली पडता पडता सुमने प्रसंगावधान राखून मुलाला हातात उंच धरल्याने त्याला कोणतीही इजा झाली नाही.
सदर अपघात निदर्शनास येताच सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली, तसेच गणेश रोकडे यांची रुग्णवाहिका तातडीने बोलावून रक्तबंबाळ सुमन दबाले हिला जिल्हा रुग्णालयात हलविले.
चालत्या बसमधून रस्त्यावर पडलेल्या सुमन दबाले हिच्या डोक्याला दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात इमर्जन्सी वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. सुमन दबाले हिला प्रसंगावधान राखून त्वरित रुग्णालयात हलविल्याबद्दल दबाले कुटुंबीयांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांना धन्यवाद दिले आहेत.