Friday, November 15, 2024

/

नंदीहळळी भागातील शेतकरी का घाबरलेत?

 belgaum

बेळगावच्या रिंग रोड प्रकल्पासाठी पश्चिम भागातील शेतकऱ्यांना वेठिस धरल्यानंतर आता रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी बेळगाव दक्षिण भागातील सुपीक शेतजमीनकडे शासनाची वक्रदृष्टी वळल्याने शेतकरीवर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना भेटून गाऱ्हाणे मांडण्याची तयारी शेतकऱ्यांनी चालविली आहे.
देसुर ते बागलकोट दरम्यान नवा रेल्वेमार्ग घालण्यात येणार आहे या नियोजित रेल्वे प्रकल्पासाठी माती परीक्षणाचे काम सध्या बेळगाव दक्षिणकडील नंदीहळ्ळी देसुर भागात सुरू आहे.

देसुर ते बागलकोट या नियोजित रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. यासाठी ठिकठिकाणी माती परीक्षण केले जात आहे, तथापि या नियोजित प्रकल्पासंदर्भात तसेच जमीन संपादनाबाबत संबंधित शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कोणतीही नोटीस आलेले नाही. सध्या या भागात माती परीक्षणाचे काम सुरू असल्याने नियोजित रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. नंदीहळ्ळी, देसुर, गर्लगुंजी आदी भागातील शेतजमीन सुपीक आहे. त्यामुळे या जमिनीतून रेल्वेमार्ग गेल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. नियोजित रेल्वे प्रकल्पांची जाहीर घोषणा करण्यात आली नसली तरी पश्चिम भागातील शेतकऱ्यांप्रमाणेच आपल्याला आंदोलने करावी लागणार की काय,लाख मोलाच्या जमिनी गमवाव्या लागल्याने त्यांच्याप्रमाणेच आपलीही अवस्था होणार की काय अशी भीती नंदीहळ्ळी परिसरातील शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

दरम्यान नंदीहळ्ळी येथील परशराम जाधव, सुरेश जाधव या शेतकऱ्यांनी नियोजित रेल्वे मार्गाला आमचा विरोध नाही, मात्र हा रेल्वे मार्ग सुपीक पिकाऊ जमिनीतून नेण्याऐवजी गावाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या पडीक जमिनीतून न्यावा, असे मत व्यक्त केले. नियोजित रेल्वे प्रकल्पात सुरेश जाधव यांची सगळीच शेतजमीन भू संपादित केली जाण्याची शक्यता आहे.

Nandihalli map
Nandihalli map

नियोजित प्रकल्पाच्या मार्गावरील जमिनीचे माती परीक्षण केले जात असल्यामुळे सुरेश जाधव यांनी संभाव्य भूसंपादनाच्या विरोधात पंचायतीकडे अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. नियोजित देसूर – बागलकोट रेल्वेमार्गाच्या प्रकल्पासाठी नंदीहळ्ळी, देसुर, गर्लगुंजी आदी भागातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या पिकाऊ शेतजमिनी भू संपादित केल्या जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नंदीहळ्ळी गावच्या शेजारील नागेनहाळ गावचे मूळ रहिवासी असलेले रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना भेटून गाऱ्हाणे मांडण्याचा निर्णय संबंधित शेतकऱ्यांनी घेतला आहे. यासाठी गेल्या आठ दिवसापासून हे शेतकरी प्रयत्नशील आहेत. तथापी रेल्वेमंत्री अंगडी हे अद्यापही नवी दिल्ली येथे असल्याचे सांगण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची त्यांच्याशी भेट होऊ शकलेली नाही.

गेल्या काही वर्षात बेळगावचा रिंग रोड, हलगा मच्छे बायपास, एसटीपी प्लांट तसेच अन्य विविध शासकीय योजनांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. यासंदर्भात काही शेतकऱ्यांना नोटीसा गेल्या आहेत तर काहींना गेलेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती असताना आता देसूर ते बागलकोट नियोजित रेल्वे मार्गासाठी माती परीक्षण होत असल्याने हा एक चर्चेचा विषय बनला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.