गेले 6 वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला तरी बेळगावातील सुप्रसिद्ध बेळगाव क्लब आणि युनियन जिमखाना लिमिटेडच्या दीर्घ मुदतीच्या जमीन भाडे कराराचे नूतनीकरण न झाल्यामुळे सरकारी तिजोरीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कॉम्प्युटरर ऑडिटर जनरल (सीएजी) यांच्या निदर्शनास आले आहे.
सीएजीच्या माहितीनुसार बेळगाव क्लब आणि युनियन जिमखाना हे दोन्ही क्लब व्यावसायिक कारणासाठी संरक्षण दलाच्या जमिनीचा बेकायदा वापर करत आहेत. संरक्षण मंत्रालयाने क्रीडा व मनोरंजनासाठीच्या क्लबस् बाबतच्या आपल्यात धोरणाचे नूतनीकरण केले नसल्याने जागेच्या किमतीवरील व्याजाचा बोजा वाढला असल्याचे जून 2018 पर्यंतच्या सीएजीच्या पाहणीत आढळून आले आहे.
बेळगाव क्लब व युनियन जिमखाना यांच्या व्यतिरिक्त कोलकाता येथील ईडन गार्डन्स चे गेल्या 7 वर्षापासून तर रेसिडेन्सी क्लब पुणे या क्लबच्या दीर्घ मुदतीच्या भाडे कराराचे गेल्या तब्बल 13 वर्षापासून नूतनीकरण झालेले नाही. यामुळे सरकारी तिजोरीचे 27.42 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
1898 साली स्थापन झालेला क्लब रोडवरील बेळगाव क्लब हा उत्कृष्ट इंग्लिश कंट्री क्लबच्या परंपरेतील बेळगावातील सर्वात जुना क्लब आहे. हा क्लब सुमारे 11 एकर जागेत स्थापित असून येथे विविध प्रकारचे खेळ, आरोग्य तंदुरुस्ती आणि व्यवसाय सुविधा, साधे आणि उच्च प्रतीचे उपहारगृह, गेस्टरूम आदी सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत.
1924 साली कॅम्प येथे स्थापन झालेला युनियन जिमखाना क्लब ही क्रिकेट व इतर क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणारी बेळगावातील सर्वात जुनी क्रीडा संस्था आहे.
लाला अमरनाथ, मोहिंदर अमरनाथ, सुनील गावस्कर, गुंडाप्पा विश्वनाथ, सय्यद किरमाणी, ब्रिजेश पटेल, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, रवी शास्त्री, शिवलाल यादव, एकनाथ सोलकर आदी बरेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू युनियन जिमखाना मैदानावर खेळले आहेत.