टिळकवाडी येथील महर्षी रोड लेले मैदानानजीक महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून परिसरातील पालापाचोळा एका झाडाखाली जाळला जात असल्याबद्दल पर्यावरणप्रेमींनी मध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
टिळकवाडी लेले मैदान परिसरात बहुसंख्य झाडे आहेत. परिणामी या ठिकाणच्या रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात पालापाचोळा जमा होत असतो.
सदर पालापाचोळा जमा करून तो नजीकच्या भंगी बोळात टाकण्याऐवजी येथे कार्यरत महापालिकेची महिला सफाई कामगार पाचोळ्याचा ढिग लेले मैदानानजीकच्या एका झाडाखाली जमा करून पेटवून देते. लेले मैदानावर सकाळी फिरावयास येणार्या लोकांना हा प्रकार सर्रास पहावयास मिळतो. संबंधित झाडाखाली दररोज अशाप्रकारे पालापाचोळा जाळण्यात येत असल्यामुळे त्या झाडाचे अस्तित्व आगीच्या धगीमुळे धोक्यात आले आहे.
दरम्यान, याबाबत चौकशी केली असता मैदानजीकच्या भंगी बोळात शेजारी बंगल्याचे मालक आपल्या कारगाड्या उभ्या करतात. त्यामुळे पालिकेच्या महिला सफाई कामगाराला गोळा केलेला पालापाचोळा भंगी बोळात नेऊन टाकण्याऐवजी तो मैदानाशेजारील झाडाखाली जाळणे सोयीचे वाटते असे समजले. खरंतर हा प्रकार चुकीचा आहे त्यामुळे संबंधित झाडाचे नुकसान होत आहे.
तेंव्हा या भागाचे नगरसेवक आणि महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सफाई कर्मचाऱ्यांना कोणत्याही झाडांना इजा होणार नाही अशा ठिकाणी कचरा जाळण्याच्या सूचना द्याव्यात, अशी पर्यावरण प्रेमींची मागणी आहे.