‘साउथ कोकण एज्युकेशन सोसायटी ही बेळगाव शहरातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था असून या संस्थेच्यावतीने बेळगाव शहर आणि परिसरात विविध शैक्षणिक संस्था चालविल्या जातात. या संस्थेचा अमृत महोत्सव दि. 21 ते 24 डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रमानी साजरा होत आहे’ अशी माहिती एस. के. ई. संस्थेचे चेअरमन आर. डी. शानभाग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संस्थेच्या वाटचालीबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, या संस्थेची स्थापना 1940 साली करण्यात आली. महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांना चले जाव चळवळीची हाक 1942 साली दिली, त्यावेळी राष्ट्रउभारणीच्या कार्यात मदत करण्यासाठी कोंकण विभागातील अनेक समाजसेवक व देशभक्त पुढे आले त्यांनी सुरू केलेल्या या संस्थेला सावंतवाडीच्या राजमाता राणी पार्वतीदेवी यांचे नांव देण्यात आले. सावंतवाडी येथे 1945 साली पहिले राणी पार्वतीदेवी महाविद्यालय सुरू करण्यात आले. त्यावेळी कला आणि विज्ञान या दोन शाखा होत्या. त्यानंतर बेळगावात 1948 साली राणी पार्वतीदेवी महाविद्यालय सुरू करण्यात आले. डॉ. जी. व्ही. हेरेकर, श्री अण्णासाहेब लठ्ठे, बाबुराव ठाकूर, व्ही. व्ही. हेरवाडकर ,डॉ. वाय. के. प्रभू आणि इतर समाजसेवकांनी हे महाविद्यालय सुरू केले .त्यासाठी जमखंडीच्या पटवर्धन सरकारांनी आपली जागा या संस्थेला दान दिली. ज्या जागेत हे महाविद्यालय उभारण्यात आले. कालांतराने राणी पार्वतीदेवी (आरपीडी) महाविद्यालयाचे कला (आर्ट्स) व 1966 साली गोविंदराम सक्सेरिया विज्ञान (सायन्स) महाविद्यालय सुरू झाले.
आज एस के ई सोसायटीचा वटवृक्ष बहरला असून या संस्थेच्या पुढील शैक्षणिक शाखा ज्ञानदानाचे कार्य करत आहेत .त्यापैकी जी. एस. एस. कॉलेजमध्ये बीएससी ,एमएससी व बीसीए कोर्सेस ,जी. एस. एस. पियू कॉलेज ,आर.पी. डी. महाविद्यालयात बीए, बीकॉम व बीबीए, आरपीडी न्यू आर्ट्स- कॉमर्स कॉलेज, ठळकवाडी हायस्कूल, स्वाध्याय विद्या मंदिर हायस्कूल ,व्ही. एम. शानभाग मराठी शाळा, एम. आर. भंडारी कन्नड शाळा ,एसकेई सोसायटीचा परदेशी भाषा अभ्यासक्रम ,एसकेई सोसायटीची स्पोर्ट अकॅडमी ,इगनो अभ्यास केंद्र आणि योगाचे सर्टिफिकेट कोर्सेस आदी संस्थांचा समावेश आहे.
या संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी आज देश-विदेशात नावारूपास आले आहेत. त्यामध्ये अरुण जायन्नावर भटनागर पुरस्कार विजेते, मैत्रेय कुलकर्णी आयएफएस, गिरीश नाईक ,नागलअंबिका देवी, वाय एस पाटील ,जी कुमार नायक यांच्यासारखे आयएएस ऑफिसर, साहित्यक्षेत्रात अनंत मनोहर ,माधुरी शानभाग, उमा कुलकर्णी ,निरंजन संत, डॉक्टर शोभा नाईक, डॉक्टर संध्या देशपांडे यांच्यासारखे साहित्यिक, के एल ई विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉक्टर व्ही. डी. पाटील ,आयआयएससी बेंगलोरचे प्राध्यापक नरेंद्र दीक्षित, कलाक्षेत्रातील प्रसाद पंडित ,अतुल कुलकर्णी ,नीरज शिरवळकर ,विनय कुलकर्णी, सुघोष भारद्वाज ,गायन क्षेत्रातील जितेंद्र अभिषेकी ,सारंग कुलकर्णी, संगीता बांदेकर ,रफिक शेख ,अमेरिकेच्या बँक ऑफ अमेरिकाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास सामंत ,कर्नाटकचे माजी सचिव विजय गोरे आदी अनेक मान्यवर या संस्थेने निर्माण केले आहेत.
गेल्या 75 वर्षात संस्थेने घेतलेली गरुड झेप अतिशय उज्ज्वल आहे. येत्या 21 ते 24 डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने हा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गेल्या 14 डिसेंबर रोजी विद्यार्थी -कर्मचारी आणि संस्थाचालक यांचा सहभाग असलेली भव्य अशी रॅली काढण्यात आली होती. रॅलीची सुरुवात अमृत महोत्सव समितीच्या अध्यक्ष सौ. बिंबा नाडकर्णी यांच्या हस्ते करण्यात आली. चार हजाराहून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग असणारी ही रॅली अभूतपूर्व अशी झाली. त्याचप्रमाणे 17 डिसेंबर रोजी ठिक-ठिकाणी झालेला विद्यार्थ्यांचा फ्लॅशमॉब नागरिकांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. 21 डिसेंबर रोजी अमृत महोत्सवाचा शुभारंभ कर्नाटकचे माजी मंत्री आणि संस्थेचे माजी विद्यार्थी श्री. आर. व्ही. देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे .त्यादिवशी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा भरत असून त्यामध्ये सुमारे पंधराशे माजी विद्यार्थि सहभागी होत आहेत .
सकाळी 10.30 वाजता संस्थेचे उपाध्यक्ष आणि जी एस कॉलेजचे माजी विद्यार्थी किरण ठाकूर यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन होणार असून 11.30 वाजता उद्योजक दिलीप चिटणीस यांच्या हस्ते फोटो गॅलरी उद्घाटन होईल. त्यानंतर ‘एसकेई श्री’ व ‘मिस एसकेई’ या स्पर्धा होतील .त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता ‘लख लख चंदेरी’ हा डॉ. संध्या देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेला संस्कृतीक कार्यक्रम होईल. अशाप्रकारे दिवसभर माजी विद्यार्थ्यांसाठी भरगच्च कार्यक्रम होतील. अमृतमहोत्सवानिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे स्टाल्स मांडण्यात येणार असून ही खवय्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.
22 डिसेंबर रोजी अमृत महोत्सवचा मुख्य कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता होईल. या कार्यक्रमास श्री सुशील पंडित आणि सुबोध भावे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी हे मान्यवर उपस्थित राहतील. 23 डिसेंबर हा एस के ई सोसायटीच्या संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध कार्यक्रमाचा दिवस असेल, तर 24 डिसेंबर रोजी सध्या संस्थेत शिक्षण घेत असलेल्या आजी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम होऊन या अमृत महोत्सवाची सांगता होईल.
या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संस्थेतर्फे सव्वा कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय पातळीवरचे स्विमिंग पूल, चार कोर्टचा बॅडमिंटन हॉल, 1000 क्षमतेची ऑडिटोरियम आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावे जिओलॉजी म्युझियम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री शानभाग यांनी दिली.
पत्रकार परिषदेस संस्थेच्या अमृत महोत्सव कमिटीच्या चेअरपर्सन बिंबा नाडकर्णी, उपाध्यक्ष ज्ञानेश कलघटगी, संस्थेचे अध्यक्ष सेवांतीलाल शहा, सेक्रेटरी आर. बी. देशपांडे, संध्या देशपांडे, एस. वाय. प्रभू- आजगावकर, गीता कित्तूर यांच्यासह संस्थेचे इतर संचालक आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्य अचला देसाई व जीएसएस महाविद्यालयाचे प्राचार्य नागराज हेगडे हेही उपस्थित होते.