परिवहन मंडळाच्या बस मधून पडून एक विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी गणेशपूर नजीक घडली.
स्नेहल देसुरकर असे बस मधून पडून जखमी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांनीचे नाव आहे.
शाळेला जाण्यासाठी स्नेहल बसमध्ये चढत असताना बस सुरू झाल्याने ती रस्त्यावर पडली. या अपघातात सुदैवाने स्नेहलला कोणतीही गंभीर इजा झाली नाही. तथापि हा प्रकार घडताच संतप्त नागरिकांनी काही काळ बस रोखून धरली. परिवहन मंडळाचे बस चालक बेजबाबदारपणे बस चालवत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
प्रवासी बसमध्ये व्यवस्थित चढले किंवा उतरले की नाही याची तमा न बाळगता ते आपल्या मर्जीने बस हाकतात. त्यामुळे बसमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवासी विशेष करून शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
याची गांभीर्याने दखल घेऊन परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व बस चालक आणि वाहकांना समज देण्याची जोरदार मागणी होत आहे.