कॅम्प (बेळगाव) येथील सेंट झेवियर्स स्कूलचा विद्यार्थी साई मुंगारी याने 65 व्या एसजीएफआय राष्ट्रीय प्राथमिक आंतरशालेय कराटे स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले.
स्कूल गेम्स ऑफ फेडरेशन इंडिया आणि पंजाब राज्य सार्वजनिक शिक्षण खाते यांच्यावतीने जबलपूर येथे ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत बेळगावचा कराटेपटूं साई मुंगारी याने 14 वर्षांखालील मुलांच्या 60 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावून बेळगाव कराटे क्षेत्राचा मान राखला.
तो कराटे प्रशिक्षक जितेंद्र काकतीकर यांच्याकडे कराटे खेळाचे धडे घेतो.
त्याला शाळेचे मुख्याध्यापक थॉमस चंपाकरा, क्रीडा शिक्षक चेस्टर रोझारिओ, ज्युलेट फर्नांडिस, पालक तसेच बेळगाव सार्वजनिक शिक्षण खाते आणि शहर शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन लाभले आहे.
या स्पर्धेत यंदा राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक मिळविणारा साई हा बेळगावचा एकमेव कराटेपटू आहे. त्याने बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवून बेळगावचा मान राखल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.