हिंदवाडी येथे विष घालून तब्बल 8 कुत्र्यांना ठार मारल्याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. मात्र त्यांच्याविरुद्ध कोणीही तक्रार करण्यास पुढे न आल्याने त्यांना सक्त ताकीद देऊन सोडून देण्यात आले.
अनगोळ- वडगाव रोड हिंदूवाडी येथील पारिजात कॉलनी मध्ये गेल्या 6 डिसेंबर रोजी समाजकंटकांनी 8 कुत्र्यांना विष घालून ठार मारले होते.
या प्रकारामुळे हिंदवाडी परिसरातील पाळीव कुत्र्यांच्या मालकांचे धाबे दणाणले होते. तब्बल 8 कुत्र्यांना समाजकंटकांनी विष घालून ठार मारल्याने घाबरलेल्या पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी आपआपल्या कुत्र्यांना मोकळे सोडणे बंद केले होते. ठार मारण्यात आलेल्या आठ कुत्र्यांमध्ये हिंदवाडीतील रहिवासी रमेश उप्पार यांच्या कुत्र्याचाही समावेश होता. अमानुष मनोरुग्ण समाजकंटकांकडूनच कुत्र्यांना ठार मारण्याचा हा प्रकार झाला असला पाहिजे असे उप्पार यांचा कयास आहे.
हिंदवाडी कुत्र्यांना ठार मारण्याच्या या प्रकाराची गंभीर दखल घेऊन प्राणी दया संघटना बेळगावचे (बीएडब्ल्यूए) सदस्य वरूण कारखानीस, अभिजीत सामंत आणि अमित चिवटे यांनी शोध कार्य हाती घेऊन दोघा संशयितांना पोलिसांच्या मदतीने पकडले.
दोघा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहन नागरिकांना केले तथापि एकाही नागरिकाने त्या संख्या संशयितांविरुद्ध तक्रार दाखल करण्यास तयारी दर्शविली नाही परिणामी पोलिसांनी संबंधित दोघा जणांना सक्त ताकीद देऊन सोडून दिले. त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास आता सहकार्य करून कारवाई केल्याबद्दल बीएडब्ल्यूए संघटनेच्या अमित चिवटे व इतरांनी टिळकवाडी पोलीसांना धन्यवाद दिले.