एअरमन ट्रेनिंग स्कूल येथील बेसिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एअर फॉर्स स्टेशन सांबरा बेळगाव येथे 3253 प्रशिक्षणार्थी एअरमन्सचा दीक्षांत समारंभ शुक्रवारी मोठ्या दिमाखात पार पडला. भारतीय हवाई दलाच्या ‘एअर डेव्हिल्स’ या 6 पॅराशुटर्सच्या चमुची चित्तथरारक स्काय डायव्हिंग प्रात्यक्षिके हे या समारंभाचे मुख्य आकर्षण ठरले.
बेसिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एअर फॉर्स स्टेशन सांबरा बेळगाव येथील एअरमन्सच्या दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून एअर व्हाईस मार्शल संजीव राज हे उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करण्यात आल्यानंतर प्रमुख पाहुणे एअर व्हाईस मार्शल संजीव राज यांनी परेडची पाहणी करून मानवंदना स्वीकारली.
प्रमुख पाहुण्यांना वाद्यवृंदाच्या तालावर पथसंचलनातद्वारे मानवंदना देण्यात आल्यानंतर 3253 एअरमन्सना देशसेवेची शपथ देवविण्यात आली. त्यानंतर प्रशिक्षणादरम्यान विविध प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या एअरमनना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आकर्षक करंडक देऊन सन्मानित करण्यात आले. एअरमन आकाश (जनरल सर्व्हिस ट्रेनिंग), एअरमन ओमकार झा (बेस्ट अकॅडमिक) व एअरमन सागर नाथ (फर्स्ट इन ऑर्डर ऑफ मेरीट) अशी बक्षीस विजेते विजेत्यांची नावे आहेत.
भारतीय हवाई दलाच्या ‘एअर डेव्हिल्स’ या 6 पॅराशूटर्सच्या चमुची चित्तथरारक स्काय डायव्हिंग प्रात्यक्षिके हे या समारंभाचे मुख्य आकर्षण ठरले. बेळगाव एअरमन ट्रेनिंग स्कूलचे विंग कमांडर अजय कुमार यांनी स्काय ड्रायव्हर्सच्या चमूचे नेतृत्व केले. एमआय 17 हेलीकॉप्टरमधून तब्बल आकाशात 8000 फुट उंचीवरून खाली जमिनीवर उड्या घेणाऱ्या या पॅराशुटर्सनी समारंभास उपस्थित सर्वांना श्वास रोखून धरावयास लावले होते.