स्मार्ट सिटीच्या नावाखाली एकाचवेळी अनेक रस्त्यांची निर्मिती व सुधारणा काम शहरात सुरू आहे. परिणामी सर्वत्र सावळागोंधळ दिसत असून अनेक मार्ग बंद असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. एकेरी वाहतूक केल्याने आता यात रेल्वे ओव्हरब्रीजची भर पडली आहे.
गोगटे सर्कल येथील रेल्वे ओव्हर ब्रिजवर आजपासून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सध्या टिळकवाडी, शहापूर, तिसरे रेल्वे गेट आदी ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांचे काम सुरू आहे. परिणामी बऱ्याच ठिकाणी रस्ते बंद आहेत अथवा संबंधित मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीचे कोंडी होऊन नागरिक आणि वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यात आता रेल्वे ओव्हर ब्रिजची भर पडली आहे.
या ब्रिजवरील दुतर्फा वाहतूक बंद करून आजपासून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. यामुळे बेळगाव शहराच्या दिशेने येणाऱ्या वाहन चालकांना शहापूर मार्गे अथवा काँग्रेस रोड मार्गे जावे लागत आहे. परिणामी संबंधित मार्गावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे, शिवाय वाहनचालकांना वेळेचा अपव्यय आणि रस्त्यावरील गर्दी यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शुक्रवारी सकाळपासून अचानक एकेरी वाहतूक सुरू झाल्याने या मार्गावरून दररोज ये जा करणाऱ्या वाहनचालकांचा गोंधळ उडाला. बऱ्याच जणांना ब्रिजपर्यंत जाऊन पुन्हा माघारी परतावे लागत होते. रेल्वे ओव्हब्रीज सारख्या एखाद्या महत्त्वाच्या रस्त्यावर जर एकेरी वाहतूक सुरू करायची असे तर तशी जाहीर पूर्वसूचना नागरिकांना द्यावी, अशी मागणी बहुतांश वाहनचालक करताना दिसत होते.
गोगटे सर्कल उड्डाण पूलचे उदघाटन होऊन येत्या 25 डिसेंम्बर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे मात्र एक वर्ष व्हायच्या अगोदर दुरुस्तीसाठी ब्रिज एकेरी वाहतूक चालू करण्यात आली आहे.