कडोली येथील ‘त्या’ अत्याचार पीडित बालिकेला 1 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा ठराव आज मंगळवारी झालेल्या कडोली ग्रामपंचायतीच्या तातडीच्या बैठकीत संमत करण्यात आला.
गावातील एका निष्पाप बालिकेवर नराधमाने केलेल्या अत्याचाराची गंभीर दखल घेऊन मंगळवारी बोललेल्या कडोली ग्रामपंचायतीच्या बैठकीत हा ठराव एकमताने संमत करण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्षा मनीषा पाटील या होत्या. पीडित मुलीला 1 लाख रूपयांचे अर्थसहाय्य करण्याच्या ठरावा बरोबरच अपराधी आणि त्याच्या आई-वडिलांचा यांच्या निषेधाचा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. याव्यतिरिक्त ग्रा. पं. सदस्य शांता बाळू बायनाईक यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव बैठकीत मांडण्यात आला. तसेच भैरू बायनाईक याला ग्रामपंचायतीतील कामावरून वजा करण्याच्या शिफारशिचा ठराव आणी सदर घटनेत वेगाने कारवाई केल्याबद्दल पोलीस खात्याचे अभिनंदन करणारा ठराव एक मताने संमत करण्यात आला.
बैठकीत पीडित मुलीच्या कुटुंबीयांसाठी घराची व्यवस्था करणे तसेच कायदेशीर व इतर मदत करणे याबाबत चर्चा करण्यात आली. त्याच प्रमाणे पीडित मुलीला आणि आणि तिच्या कुटुंबियांना नागरिकांनी आर्थिक सहाय्य करावे, असे जाहीर आवाहन बैठकीत करण्यात आले. बैठकीस ग्रा. पं. विकास अधिकारी अश्विनी कुंदरगी यांच्यासह ग्रा. पं. सदस्य उदय सिद्ध नावर, यल्लाप्पा कुट्रे, सुनील कासद, शोभा कुरंगी तसेच अन्य सदस्य उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा कुट्रे यांनी बैठकीत संमत करण्यात आलेल्या ठरावांची माहिती देऊन सर्व ग्रामपंचायत सदस्यतर्फे पीडित मुलीच्या नावावर तिचे शिक्षण तसेच अन्य बाबींसाठी 1लाख रुपयांची कायम स्वरूपी ठेव बँक ऑफ इंडिया अथवा पोस्टात ती 18 वर्षे होईपर्यंत ठेवली जाईल, असे सांगितले. ग्रा. पं. सदस्य सुनील कासद यांनी अत्याचारात या घटनेतील आरोपी आणि त्याचे आई-वडील यांना जामीन मिळू शकणार नाही अशी कलमे पोलिसांनी लावली आहेत. तथापि त्यांची सुटका न होता त्यांना शिक्षा व्हावी यासाठी कोणत्याही वकिलाने त्यांचे वकीलपत्र स्वीकारू नये असे अशा मागणीचेे निवेदन बेळगाव बार असोसिएशनला देण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. तसेच बार असोसिएशनने देखील आपली मागणी मान्य केली असल्याचे त्यांनी सांगितले.