रणझुंझार साहित्य अकादमी आयोजित नववे ग्रामीण मराठी बाल साहित्य संमेलन रविवारी निलजी येथे उत्साहात पार पडले.
निलजी ( ता. बेळगाव) येथील रणझुंजार सोसायटीच्या प्रांगणातून रविवारी सकाळी या संमेलनाची ग्रंथदिंडी काढण्यात आली. प्रमुख पाहुणे यल्लाप्पा बैलवाड यांच्या हस्ते पालखी पूजन झाले.
ढोल ताशाच्या गजरात मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या शाळकरी मुला-मुलींसह मान्यवर साहित्यिक, कवी आणि साहित्यप्रेमींच्या उपस्थित गावातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या ग्रंथदिंडीचे सांगता रणझुंझार हायस्कूलच्या पटांगणात रणझुंझारनगरीत झाली.
संमेलनस्थळी बेळगाव रुरल प्रवेशद्वार आणि पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच विविध प्रतिमांचे पूजन झाल्यानंतर ईशस्तवन व स्वागत गीताने प्रमुख उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यावेळी प्रमुख पाहुणे के. सी. मोदगेकर, रणझुंजार साहित्य अकादमीचे अध्यक्ष अशोक मोदगेकर, संमेलनाध्यक्षा डाॅ. शीतल मालुसरे, प्रा. अशोक अलगोंडी, विठ्ठल पाटील, विजय पाटील, किशोर मोदगेकर, चंदन मोदगेकर,श्याम मुतगेकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. स्वागत व प्रास्ताविक रणझुंझार साहित्य अकादमीचे अध्यक्ष सी. वाय. पाटील यांनी केले.
उद्घाटन समारंभानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. शीतल मालुसरे यांनी स्पर्धेच्या युगात शूरवीरांचा इतिहास जगण्याची प्रेरणा देतो असे सांगितले. तसेच आजच्या पिढीला हिमालयासारखे उत्तुंग भरारी घ्यायची असेल तर त्यांनी पाय जमिनीवर ठेवून वास्तवात जगायला शिकायला हवे असे सांगून आपले समयोचित विचार व्यक्त केले. याप्रसंगी अन्य मान्यवरांची ही समयोचित भाषणे झाली.
या ग्रामीण मराठी बाल साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कथाकथनाचा कार्यक्रम पार पडला या सत्रात दहा विद्यार्थ्यांनी बहारदार कथाकथन सादर केले त्यानंतर तिसऱ्या सत्रात कविसंमेलन झाले.
कविसंमेलनात साक्षी मोदगेकर, आदिती पाडसकर,श्रुती नेवगिरे, रूपा देसगई, श्रीरंग मोदगेकर, रिती पाटील सानिया पाटील, प्रथमेश पाटील, अश्वजित चौधरी, अंजली नेवगिरी अंकिता मोदगेकर मेघा मोदगेकर,सानिका पाटील, अमित नेवगिरी, सानिका मुतगेकर, नारायणी कणबरकर व अश्विनी मोदगेकर या बालकवींचा सहभाग होता. सदर बाल साहित्य संमेलनास साहित्यप्रेमींसह विविध शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.