सरत्या वर्षाला निरोप देऊन नूतन वर्ष 2020 चे स्वागत करण्यासाठी शहरवासीय जोमाने तयारीला लागले असून नववर्षाच्या स्वागताचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. 31 डिसेंबर रात्रीच्या मेजवाण्यांचे बेत आखले जात असतानाच शहरात ठिकठिकाणी ओल्डमॅन उभारण्याची जय्यत तयारीही सुरू झाली आहे. कॅम्प येथील तरुणांच्या एका गटाने बनविलेला 37 फुटी उंच ओल्ड मॅन हे यंदाचे आकर्षण ठरले आहे.
गवळी गल्ली कॅम्प येथील गोकुळ युवक मंडळाच्या 10-12 कार्यकर्त्यांनी आपल्या परंपरेनुसार यंदा देखील शहरातील सर्वात उंच ओल्ड मॅन उभारला आहे. तब्बल 37 फूट उंचीचा हा ओल्डमॅन उभारण्यासाठी संबंधित युवा कार्यकर्त्यांना सुमारे एक महिन्याचा कालावधी लागला आहे. सदर ओल्ड मॅन उभारणीचे काम महिनाभरापासून सुरू असल्याने तो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. गवळी गल्ली प्रमाणेच कॅम्प पोलिस कॉटर्स शेजारील जागेत तरुणांच्या एका गटाने 15 फुटी उंच राक्षसाची प्रतिकृती असलेला ओल्ड मॅन उभा केला आहे.
कॅम्प परिसराव्यतिरिक्त शहर आणि उपनगरांमध्ये युवा पिढी आणि बालगोपाळांकडून ओल्ड मॅन उभारण्यात येत आहेत. ज्यांना ओल्ड मॅनची प्रतिकृती बनविण्यास सवड नाही, अशा मंडळींसाठी कांही व्यावसायिकांनी तयार ओल्ड मॅन विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत.
खानापूर रोड कॅम्प येथील अमित के. आणि त्याचे कुटुंबीय गेल्या 30 वर्षांपासून ओल्ड मॅन च्या प्रतिकृती बनवून त्यांची विक्री करण्याचा व्यवसाय करतात. आपल्याकडे 4 फुटापासून ते 10 फूट उंचीपर्यंतचे ओल्ड मॅन तयार केले जातात आणि त्यांच्या उंचीनुसार दर आकारला जातो, असे अमित के. यांने सांगितले. यापैकी 4 फूट उंचीच्या ओल्डमॅनला जास्त मागणी असून त्याची किंमत 500 ते 600 रु. असल्याचेही अमितने स्पष्ट केले.
दरम्यान, थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहरातील बार चालक व दारू दुकानदारांनी आपापल्या बार-दुकानातील दारूच्या साठ्यात वाढ केली आहे. शहरातील काही मंडळी 31 डिसेंबरला दुपारपासूनच दारू दुकान अथवा बार गाठून नववर्षाच्या स्वागताला सुरुवात करतात. परिणामी थर्टी फर्स्टला संपूर्ण दिवस दारू दुकानदार आणि बार चालकांना विश्रांतीसाठी सवड नसते. हे सर्वजण सध्या ग्राहकांच्या सेवेसाठी बाह्या सरसावून सज्ज झाले आहेत.