राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुकास्तरीय न्यायालयांच्या कामकाजाच्या वेळापत्रकामध्ये 1 जानेवारी 2020 पासून बदल करण्यात आला असल्याचे कर्नाटक उच्च न्यायालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
राज्यातील जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालयीन कामकाजाचे सुधारित वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत न्यायालयीन कामकाजाचे पहिले सत्र आणि दुपारी 2.45 ते सायंकाळी 5.45 वाजेपर्यंत दुसरे सत्र होईल. यामध्ये 2 ते 2:45 वाजेपर्यंत दुपारची जेवणाची सुट्टी असेल. पूर्वी हे कामकाजाचे वेळापत्रक सकाळी 10 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत पहिले सत्र आणि दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत दुसरे सत्र असे होते. पूर्वीच्या वेळापत्रकाबाबत वकीलवर्गात नाराजी व्यक्त केली जात होती.
दरम्यान, न्यायालयाच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. अधिकारी व कर्मचारीवर्गासाठी कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. त्यांच्यासाठी दुपारी 2 ते 2. 45 ही जेवणाची वेळ राहिल.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलनी 30 डिसेंबर 2019 रोजी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी अर्धा दिवस कामकाज होईल. संबंधित न्यायालयांसाठी हा ‘नॉन सिटींग डे’ असणार आहे. न्यायालयीन अधिकाऱ्यांनी मात्र न्यायालयांची पाहणी आणि कारागृहांच्या भेटी या आपल्या कामांसाठी महिन्याच्या तिसऱ्या शनिवारा ऐवजी या चौथ्या शनिवारचा वापर करावा, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
याखेरीज प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांना 2020 या वर्षभरात 15 तात्पुरत्या रजा उपलब्ध असतील. उपरोक्त सुधारित वेळापत्रक 1 जानेवारी 2020 पासून अंमलात आणले जाणार आहे.