जिल्हा पंचायतीच्या गाळ्यांचा बेकायदा वापर होत असल्याच्या तक्रारीवरून नेहरूनगर येथील तब्बल 20 दुकान गाळ्यांना मंगळवारी पोलीस बंदोबस्तात टाळे ठोकण्यात आले. न्यायालयीन आदेश व जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नोटीसीनुसार तालुका पंचायतीने देवराज अर्स बिल्डिंग एपीएमसी रोड नेहरूनगर येथे ही कारवाई केली.
सतीश जारकीहोळी, रमेश जारकीहोळी आदी नेत्यांचे बॅनर लावून याठिकाणी काहिंनी आपला व्यवसाय थाटला होता. यामध्ये जि. पं. आजी-माजी अध्यक्ष व विविध संघटनांच्या नेत्यांचा समावेश आहे. जिल्हा पंचायतीच्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करणारी मंडळी नियमानुसार दुकान भाडे भरण्याऐवजी वसुलीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवरच दादागिरी करत होती. याबाबत तक्रारी वाढल्याने जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. राजेंद्र यांनी गेल्या 20 नोव्हेंबर रोजी स्वत: जातीने गाळ्यांना भेट देऊन पाहणी केली होती. शिवाय भाडे थकवलेल्यांना नोटीस बजावली होती. मात्र तरीही संबंधित गाळेधारक नोटिसीला भीक घालत नसल्याने मंगळवारी सकाळी न्यायालयाच्या आदेशासह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नोटीसद्वारे देवराज अर्स बिल्डींगमधील तब्बल 20 दुकान गाळ्यांना टाळे ठोकण्यात आले.
तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. प्रारंभी सकाळी त्यांनी 20 पैकी 18 गाळ्यांना टाळे ठोकले. मात्र उर्वरित दोन गळ्यातील लोकांनी सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेल्या या कारवाईस विरोध केल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले.
अखेर एसीपी एन. व्ही. बरमनी, पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व उपनिरीक्षक s.v. कट्टी यांच्या मध्यस्थीने त्या दोन गाळ्यांना देखील टाळे ठोकण्यात आले. सदर टाळे ठोकण्याची कारवाई नेहरूनगरातील व्यापारी बांधवात चर्चेचा विषय झाली आहे.