मेजर रामस्वामी अवेन्यू रोड नानावाडी क्रॉस आणि काँग्रेस रोड दरम्यानच्या नाल्याची सफाई करताना प्रथम नाल्याच्या एका तोंडाला साचलेल्या मातीच्या गाळाचा उपसा करावा, अशी मागणी केली जात आहे.
सध्या बेळगाव महानगरपालिकेकडून काँग्रेस रोड परिसरातील नाल्यांची साफसफाई केली जात आहे. मेजर रामस्वामी अवेन्यू रोड नानावाडी क्रॉस हा रस्ताही याला अपवाद नाही. दरवर्षी पावसाळ्यात हा नाला तुडुंब भरून वहात असतो. नानावाडी परिसरातील पावसाचे पाणी, सांडपाणी, आणि कचरा मोठ्या प्रमाणात या नाल्यातून वहात असतात.
त्यामुळे या नाल्याच्या एका तोंडापाशी मोठ्या प्रमाणात मातीचा गाळ आणि कचरा साचला आहे. ज्यामुळे काही काळाने या नाल्याचे तोंड बंद होऊ शकते. तेंव्हा सदर नाल्याची सफाई करताना या ठिकाणी साचलेला मातीचा गाळ प्रथम काढण्यात यावा, जेणेकरून नाल्यातील पाण्याचा व्यवस्थित निचरा होऊ शकेल असे या भागातील नागरिकांचे मत आहे.
यापूर्वी सदर नाला तुंबल्याने आसपासच्या नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून महापालिकेने या नाल्याची सफाई केली होती.
मात्र ही सफाई करताना नाल्याच्या तोंडाशी असलेला गाळ काढण्यात आला नव्हता. त्यामुळे हा नाला पुन्हा वरचेवर तुंबण्याचा प्रकार घडत आहे. तेंव्हा यावेळी नाला सफाई करताना महापालिकेने प्रथम सदर नाल्याच्या एका तोंडापाशी मोठ्या प्रमाणात साचलेला मातीचा गाळ काढण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.