बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील काही हॉटेलमधून रात्रीच्या वेळी शुल्लक कारणावरून सातत्याने हाणामारीच्या घटना घडत असल्याने या भागातील हॉटेल्स रात्री ठीक 9 वाजता बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या आदेशामुळे गेल्या तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळी संबंधित हॉटेल परिसरात शुकशुकाट पहावयास मिळत आहे.
मध्यवर्ती बसस्थानक भागातील कांही हॉटेलमध्ये रात्रीच्या वेळी सातत्याने क्षुल्लक कारणावरून हाणामारीच्या घटना घडत असल्याने पोलीस खात्याने याची गंभीर दखल घेऊन पी. बी. रोड येथे नुकतीच हॉटेल मालकांची बैठक बोलवली होती. या बैठकीत एसीपी नारायण बरमणी यांनी यापुढे दररोज रात्री 9 वाजता संबंधित हॉटेल्स बंद करण्याचा आदेश त्या हॉटेल मालकांना दिला.
यावेळी उपस्थित हॉटेल मालकांपैकी काहींनी नाराजी व्यक्त करून इतक्या लवकर हॉटेल्स बंद केले तर व्यवसाय कसा करायचा असा प्रश्न उपस्थित केला. तेंव्हा एसीपी बरमणी यांनी त्यांना फैलावर घेऊन हॉटेल परिसर शांत राहत नसेल तर आम्हाला 9 पुर्वीच हॉटेल बंद करावे लागतील असा कडक इशारा देताच रात्री ठीक 9 वाजता हॉटेल बंद करण्यास सर्वांनी होकार दर्शविला.
परिणामी गेल्या तीन दिवसांपासून मार्केट पोलीस वाहनातून फिरून रात्री 9 नंतर मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील हॉटेल्स बंद करण्यास सांगत आहेत. या कारवाईमुळे संबंधित हॉटेल परिसरात सध्या रात्रीच्या वेळी सामसूम वातावरण असते. तथापि संबंधित हॉटेल रात्री नऊलाच बंद होत असल्याने शहरातील सर्वसामान्य खवय्ये आणि मध्यवर्ती बस स्थानकावर उतरणारे प्रवासी यांची गैरसोय होताना दिसत आहे.