मच्छे येथील बस स्थानकासमोरील भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकाची समाजकंटकांनी विटंबना केल्यामुळे शुक्रवारी गावात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.
मच्छे येथे डॉ. आंबेडकरांच्या फलकाची नासधूस झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी निदर्शनास आला. समाज कंटकांनी गुरुवारी रात्रीच सदर फलकाची नासधूस केल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी सदर प्रकाराची माहिती मिळताच पोलीसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होवून सर्व कार्यकर्त्यांना शांत केले .
संघटनेचे कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाल्यानंतर त्यांनी समाजकंटकांचा निषेध करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच फलक असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याबाबत ग्राम पंचायतीला निवेदन दिले .
ग्राम पंचायत अध्यक्षा अंजना कणबरकर व पिडीओ वसंतकुमारी यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करुन ग्राम पंचायतीमध्ये अध्यक्षानी सदस्यांची तातडीची बैठक घेऊन त्या ठिकाणी नवीन फलक बसविण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नव्याने फलक बसविण्यात आल्यामुळे मच्छे गावातील तणाव निवळला .
नव्या फलकाचे अनावरण बेळगाव ग्रामीणच्या पोलीस उपनिरीक्षक कृष्णावेणी यांच्या हस्ते करण्यात आले. डाॅ. आंबेडकर युवक मंडळाचे अध्यक्ष विरुपाक्षी कोलकार, शरद बलोगी, श्रीकांत शिंगे, संतोष कांबळे, महांतेश ताशिलदार, गजानन शिंगे, भोमाणी शिंगे, कस्तुरी कोलकार, राकेश शिंगे यांच्यासह इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .