गॅस पाईपलाईन घालताना जमिनीखालील जलवाहिनी फुटून लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेल्याची घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. सदर प्रकार गुरुवारी पहाटे हिंदवाडीतील गोमटेश विद्यापीठ विद्यापीठ नजीक घडला.
जलवाहिनी फुटून शेकडो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार पहाटे या मार्गावरून फिरावयास जाणाऱ्या नागरिकांपैकी जागरूक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते दीपक अवर्सेकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्वरित शहर पाणीपुरवठा मंडळाला या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जलवाहिनीला लागलेली गळती थांबविली.
दरम्यान या पाणीगळती संदर्भात दिपक अवर्सेकर यांनी आसपासच्या नागरिकांकडे चौकशी केली असता, काल मंगळवारपासून सदर जलवाहिनी गळतीचा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या शहर व उपनगरात ठिकाणी जमिनीखाली गॅस पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. मात्र यासाठी खोदाईचे काम करताना आवश्यक ती खबरदारी घेतली जात नाही. परिणामी जलवाहिन्या फुटण्याचे काम प्रकार घडत आहेत. तरी बेळगाव महापालिका व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याची नोंद घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी होत आहे.