शहरातील कपिलेश्वर मंदिरामागील पडझड झालेल्या तलावाची स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुधारणा होणार असून तशा हालचालींना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे लवकरच या दुर्लक्षित तलावाचा कायापालट होणार आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेला तलाव सुधारणेसाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी या तलावाची पाहणी केली असून लवकरच तलाव सुधारणेचा आराखडा तयार केला जाणार आहे. सदर तलाव खूप जुना असून 2016 सालापासून तलावाच्या भिंतींची पडझड सुरू झाली होती, त्यामुळे महापालिकेने पाहणी करू देखील पुढील चार वर्षात तलावाची सुधारणा झाली नाही. दरम्यान या तलावात पोहणार्यांची संख्या जास्त असल्याने नव्याने भिंती बांधून तलाव सुसज्ज करण्याची मागणी सातत्याने होत आहे.
या पार्श्वभूमीवर तसेच शंभर कोटींच्या निधीतून शहराच्या उत्तर भागात जसे जलतरण तयार केले आहेत, तसे दक्षिण भागात नसल्याने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कपिलेश्वर मंदिरामागील या तलावाची सुधारणा केली जाणार आहे. कपिलेश्वर मंदिर परिसरात दोन तलाव आहेत. ज्यांचा वर्षातून एकदा गणेशोत्सव काळात श्री मूर्ती विसर्जनासाठी वापर होतो. तथापि या तलावांची रचना जलतरणासाठी योग्य नसल्याने मंदिरामागील तलावाचा वापर जलतरणासाठी करावा अशी शिफारस महापालिकेने स्मार्ट सिटी विभागाकडे केली आहे.
त्यानुसार स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत संबंधित तलावाच्या सुधारणेचे काम लवकरच हाती घेतले जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पडझड झाल्याने गेल्या चार वर्षापासून सुधारणेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या तलावाला आता चांगले दिवस येणार असल्याने नागरिकांत विशेषतः जलतरण प्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.