स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी बांधलेल्या बेळगावातील रेल्वे ओव्हर ब्रीजचे रेल्वे फ्लायओव्हरमध्ये रूपांतर होऊन आज 25 डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र दुर्दैवाने आपला पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी तो सुस्थितीत नाही सातत्यपूर्ण दुरुस्तीमुळे सध्या हा रेल्वे फ्लायओव्हर कोमात गेल्याचे दिसत आहे.
बेळगावातील ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हर ब्रिज त्याची शंभर वर्षाची मुदत संपल्याने धोकादायक बनला होता. परिणामी वर्षभरापूर्वी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या रेल्वे ओव्हरब्रिजची पुनर्र्बांधणी करण्यात आली. या प्रकल्पाचा त्यावेळी मोठा गाजावाजा करण्यात आला.
मोठमोठी यंत्रसामुग्री, गरडर्स रेल्वे फ्लायओव्हरच्या उभारणीसाठी मागवण्यात आले. त्यानंतर सुरुवातीला वेगाने आणि त्यानंतर काहीसे रेंगाळत असे कसेबसे या फ्लायओव्हरचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. या काळात सदर फ्लावर ते काम केव्हा एकदा पूर्ण होते आणि आणि त्यावरून केव्हा एकदा वाहतूक सुरू होते याची उत्कंठा शहरातील विशेष करून टिळकवाडी हिंदवाडी अनगोळ आदी उपनगरातील वाहनचालक आणि नागरिकांना लागून राहिली होती. अखेर गेल्या 25 डिसेंबर 2018 रोजी दुपदरी मार्ग असणारा हा रेल्वे फ्लायओव्हर ब्रिज जनतेसाठी खुला करण्यात आला. आराखड्यानुसार या फ्लायओव्हरला आकर्षक स्वरूप देण्यात आले, दुपदरी मार्गाच्या मधल्या दुभाजकावर फुलझाडे लावण्यात आली, पदपथासह रस्ताही प्रशस्त करण्यात आला. यामुळे समस्त वाहन चालक हरखून गेले. तथापि पहिल्याच पावसाळ्यात या फ्लाय ओव्हर ब्रिजवरील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचे पितळ उघडे पडले.
त्या रस्त्यांची दुरुस्ती होते ना होते तोच अलीकडे हा ब्रिज एका बाजूने खचू लागला. परिणामी दुरुस्तीच्या कामास्तव सध्या या ब्रिजवरील दुतर्फा वाहतूक बंद करून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. थोडक्यात काय तर सातत्यपूर्ण दुरुस्तीमुळे सध्या हा रेल्वे फ्लायओव्हर ब्रिज सध्या कोमात गेला आहे. सदर प्रकारामुळे नागरिकात विशेष करून वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. तसेच या रेल्वे फ्लायओव्हर ब्रिजच्या बांधकामाशी संबंधित लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, रेल्वे खाते आणि कंत्राटदाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बेळगावचे खासदार सुरेश अंगडी हे सध्या केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री आहेत त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. कोट्यावधी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलेल्या रेल्वे फ्लायओव्हर ब्रिजच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबद्दल सखोल चौकशीचे आदेश तर द्यावेच शिवाय त्यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराला समक्ष जाब विचारावा अशी जोरदार मागणी होत आहे. दुरुस्तीच्या कामास्तव सातत्याने आजारी पडणाऱ्या या ब्रिजच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार तर झाला नसावा ना? अशी शंकाही सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान वाहतुकीस खुला झाल्यानंतर अवघ्या वर्षभरात रेल्वे फ्लायओव्हर ब्रिज कोमात गेल्याचे सांगून बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. वर्षपूर्ती करणारा हा रेल्वे ओव्हर ब्रिज कोमात जाण्यास निकृष्ट दर्जाचे बांधकाम जबाबदार आहे. सातत्याने या ब्रिजची दुरुस्ती होत असल्यामुळे बेळगावकरांना या ब्रिजचा म्हणावा तसा लाभ घेता आलेला नाही. याला संबंधित अधिकारी व राजकारणी जबाबदार आहेत. खरंतर बेळगावचे खासदार असणारे सुरेश अंगडी हे सध्या केंद्रात रेल्वे राज्यमंत्री आहेत त्यांनी तरी याची गंभीर दखल घ्यायला हवी. आपल्या मतदारसंघातील महत्वाच्या रेल्वे फ्लायओव्हर ब्रीजेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असेल तर त्यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदाराची चौकशी करून त्यांना जाब विचारला पाहिजे. मात्र अद्याप ते घडत नाही त्यामुळे आम्हाला वाटते की दुर्देवाने जीव धोक्यात घालून यापुढेही ही अशाच निकृष्ट दर्जाच्या कोमात गेलेल्या ब्रिजचा वापर नागरिकांना करावा लागणार आहे, असे परखड मत नारायण सावंत यांनी व्यक्त केले.