सालाबाद प्रमाणे थंडीच्या मोसमाने साद घालण्यास सुरुवात केल्याने बेळगाव परिसरात परदेशी पक्ष्यांचे आगमन होऊ लागले आहे. पहाटे सकाळच्या वेळी थव्याथव्याने येणारे हे पक्षी सध्या नागरिकांना भुरळ पाडत आहेत.
यंदाच्या अतिवृष्टीनंतर उशिरा का होईना थंडीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बेळगाव परिसरात थंडी जाणवू लागली आहे. दरवर्षी थंडीच्या मोसमात बेळगाव परिसरामध्ये विविध प्रजातींच्या परदेशी पक्ष्यांचे स्थलांतर होत असते. यंदाही गेल्या काही दिवसांपासून या पक्षांचे थवे बेळगाव परिसर आणि तालुक्यातील नदी-नाले व तलावाच्या काठी दिसू लागले आहेत. त्यामुळे संबंधित परिसरात जणू परदेशी पक्षांचे बहुरंगी संमेलन भरल्याचा भास होत आहे. विविध रंगाच्या आणि प्रजातींच्या सुंदर पक्षांचे हे थवे सध्या पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकारांना आकर्षित करू लागले आहेत.
बेळगाव परिसरात दरवर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये भरपूर प्रकारचे पक्षी स्थलांतर करून यायला लागतात. मात्र हे पक्षी फार काळ बेळगाव परिसरात वास्तव्य करत नाहीत. बेळगाव भागात अल्पकाळ मुक्काम करून लागलीच ते पुढील प्रवासाला निघून जातात. युरोपियन रोलर, अमोर फाल्कन, लेसर केस्ट्रल आदी परदेशी पक्षांचा या अल्पकाळ वास्तव्यास आलेल्या पक्षांमध्ये समावेश असतो. हे पक्षी जेमतेम 2 – 4 दिवस बेळगाव परिसरात मुक्काम करुन पुढे आफ्रिकेच्या दिशेने स्थलांतर करतात. हे पक्षी गेल्यानंतर नोव्हेंबर मध्ये प्रामुख्याने बदक प्रजातीसह विविध प्रकारचे पक्षी बेळगावात दाखल होतात. यामध्ये काॅर्गणी, कॉमन टील, पिन टेल डक, शाॅवेलर, कॉमन मॅगार्ड, वेडर (चिखले), कॉमन स्पींट, मार्श सॅंडपाईपर, कॉमन सेंड पाईपर, वूड सॅंडपाईपर, ग्रीन शॅक वगैरे पक्षांचा समावेश असतो. चिखले पक्षाला आपल्या नावाप्रमाणे चिखल प्रिय असतो. त्यामुळे बेळगाव शहर आणि तालुक्यातील नदी , नाले, तलाव वगैरे पानथळ जागे शेजारील दलदलीच्या ठिकाणी हा आढळून येतो.
बेळगाव परिसरात तितकेसे मोठे तलाव नाहीत. त्यामुळे परदेशातून आलेले बहुतांश पक्षी मार्च- एप्रिल महिन्यामध्ये बेळगावातून गायब होतात. बेळगाव सध्या विविध प्रजातींच्या पक्षांचे आगमन झाले असल्याने बेळगाव तालुक्यातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीकाठी छायाचित्रकार बडगेर यांनी टिपलेली कांही पक्षांची सुंदर छायाचित्रे.