आर. सी. कुलकर्णी मेमोरियल ट्रस्ट संचलित संभ्रमा संस्थेतर्फे आयोजित ‘स्वीट अँड सोर’ या खाद्य पदार्थांच्या पर्यावरण पूरक विक्री प्रदर्शनाला शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसादात प्रारंभ झाला.
भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे सलग दोन दिवस या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
या ‘स्वीट अँड सोर’ खाद्यपदार्थ प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी कर्नाटक राज्य पुरस्कार विजेते जलसंवर्धक शिवाजी कागणीकर आदींच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात शिवाजी कागणीकर यांनी पर्यावरणाचे संरक्षण, जलसंवर्धन आणि तलावांचे पुनरुज्जीवन याचे महत्त्व विशद केले. तसेच जास्तीत जास्त पुरुष यासाठीच्या चळवळीत सहभागी होतील असा विश्वास व्यक्त केला .
प्रदर्शनाच्या आयोजिका क्षमा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन समारंभ प्रसंगी व्यासपीठावर शहरातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
सदर प्रदर्शनांमध्ये बेळगावसह येल्लापूर, हुबळी, हल्याळ, कोल्हापूर आदी भागातील मंडळींचे विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे सुमारे 80 हून अधिक स्टॉल्स आहेत. या खाद्यपदार्थ प्रदर्शनाचे वैशिष्ट असे की हे प्रदर्शन पर्यावरणपूरक आहे. याठिकाणी प्लास्टिकचा कमीत कमी वापर केला जात आहे. तसेच खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर जमा होणारे टाकाऊ पदार्थ अथवा खरकटे आयोजक स्वतः संकलित करून त्याचे खत तयार करणार आहेत. उद्घाटनाच्या दिवसापासूनच या प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.