शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या रस्त्याचे काम सुरू असून बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनतेला धूळ,वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.शहरात महात्मा फुले रोड,मंडोळी रोड,एस पी एम रोड,कॉलेज रोड,धारवाड रोड आणि अन्य ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत.त्यामुळे शहरात कोठेही गेले तरी वाहतूक कोंडी आणि धूळ याला सामोरे जावे लागत आहे.
एस पी एम रोडवरील एका बाजूने रस्त्याचे काम अर्धे केल्यावर दीड महिन्यातून अधिक काळ हे काम रखडले होते.होसुरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर पाईप घालण्यासाठी बरेच दिवस रस्ता खुदाई करून तसाच ठेवला होता.अजूनही तेथील माती वाहने गेल्यावर उडतच आहे.
शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नरवर तर मध्यभागी खुदाई करून नंतर मुजविण्यात आले.पण ते व्यवस्थित मुजवले गेले नसल्यामुळे माती तर उडतच आहे आणि तेथून वाहन नेताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. कॉलेज रोडवर तर वाहतुकीची कोंडी सतत होत आहे.बँक ऑफ इंडियाकडे वाहतूक पोलीस असतात पण ते काही वाहतुकीचे नियोजन करत नाहीत.
महात्मा फुले रोडवर देखील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
स्मार्ट सिटी अधिकारी आणि इंजिनियरचा कंत्राटदारावर वचक नसल्यामुळेच वाहतुकीची कोंडी आणि धुळीचा सामना बेळगावकर जनतेला करावा लागत आहे.