धुळाचे लोट आणि ट्रॅफिक जामचा त्रास सहन करणाऱ्या बेळगावकरांना आता रस्त्यावर ड्रेनेजच्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा त्रास देखील सहन करावा लागत आहे. गोवावेस प्रियांका हॉटेल समोरचे दृश्य मनपा आणि स्मार्ट सिटी यंत्रणेचे वाभाडे काढणारे आहे. याठिकाणी ड्रेनेज तुंबून त्यातील सांडपाणी संपूर्ण रस्त्यावरून वाहत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गोवावेस येथील प्रियांका हॉटेल समोरील ड्रेनेज पाईपलाईन गेल्या पंधरा दिवसांपासून तुंबली आहे. या तुंबलेल्या डॅमेज मधील दुर्गंधीयुक्त सांडपाणी संपूर्ण रस्त्यावरून वाहत असून याठिकाणी सांडपाण्याचे जणू तळेच निर्माण झाले आहे. वेळोवेळी तक्रार करून तसेच ही बाब निदर्शनास येऊन देखील महापालिकेच्या संबंधित खात्याने अद्यापही कोणतीही हालचाल केली नसल्यामुळे ड्रेनेजमधील सांडपाण्याच्या दुर्गंधीचा आणि गलिच्छतेचा त्रास गोवावेस प्रियांका हॉटेल परिसरातील नागरिक हॉटेल चालक आणि दुकानदारांना होत आहे. या सर्वांवर नाकाला रुमाल राहून लावून आपली दैनंदिन कामे करण्याची वेळ आली आहे.
सांडपाणी तुंबलेल्या खड्ड्याच्या त्याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून दुचाकी वाहनांना अपघात घडण्याच्या घटना घडत आहेत. ड्रेनेजच्या पाण्यामुळे या भागातील विहिरींचे पाणीही दूषित झाले आहे. तरी या भागाचे लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या संबंधित संबंधित अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन सदर तुंबलेल्या ड्रेनेज पाइपलाइनची युद्धपातळीवर सफाई करावी अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून सदर ड्रेनेज पाईपलाईन तुंबून सांडपाणी रस्त्यावर ओसंडून वाहत आहे. यामुळे संपूर्ण रस्ता तर गलिच्छ झालाच आहे, शिवाय सांडपाणी जमिनीत मुरत असल्याने या ठिकाणच्या विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे नागरिकांची, विशेष करून गृहिणीवर्गाची मोठी गैरसोय होत आहे, असे आनंदवाडी येथील रहिवासी प्रताप श्रेयस्कर यांनी सांगितले.
याठिकाणी चार दिवसातून एकदा पिण्याचे पाणी येते काही कारणास्तव हे पाणी आले नाही तर येथील नागरिक विहिरीतील पाण्याचा वापर करतात. मात्र सद्यपरिस्थितीत देण्याच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांना विहिरीतील पाण्याकडे पाठ फिरवावी लागली आहे. तरी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घेऊन ड्रेनेज पाईपलाईन स्वच्छ करावी तसेच आसपासच्या विहिरीमध्ये जंतुनाशक औषध टाकावे, अशी मागणी प्रताप श्रेयस्कर यांनी केली आहे.