बदलती जीवनशैली,खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी या बरोबरच व्यायामाचा अभाव यामुळे शारीरिक व्याधी उदभवतात. आपल्या बसण्याची शैली जरी नीट नसेल तर मणक्याचे,मानेचे विकार उदभवू शकतात.पूर्वी मानेचे विकार वयस्कर मंडळीत आढळायचे पण आता तरुणात देखील मानेचे विकार उदभवू लागले आहेत.याला बरीच कारणे आहेत असे उदगार प्रख्यात ऑर्थोपीडिक सर्जन नरेंद्र वैद्य यांनी काढले.
पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलतर्फे लोकमान्य रंग मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या लोकमान्य थेट संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते.या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.अनिल कालकुंद्रीकर,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे,वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष सुभाष गोरे,डॉ.जोगळेकर आदी उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानात त्यांनी समतोल आहार ,वजन वाढण्यामुळे होणाऱ्या व्याधी याची माहिती दिली.गुडघे दुखीची कारणे आणि त्यावरील उपाय याचीही माहिती डॉ.वैद्य यांनी दिली.गुडघेदुखीवर रोबोटीक सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने केले जाणारे उपचार,रोबोटीक शस्त्रक्रिया याविषयी देखील डॉ.वैद्य यांनी दृकश्राव्य माध्यमातून समजावून सांगितले.आधुनिक उपचार पद्धतीमुळे रुग्णाला इस्पितळात अगदी कमी वेळ ठेवून घ्यावे लागते.गुडघेरोपण शस्त्रक्रिया केल्यावर रुग्ण लगेच चालू शकतो असेही एका रुग्णाचे उदाहरण देऊन सांगितले.
प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.अनिल कालकुंद्रीकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.प्रारंभी उपस्थितांचे स्वागत डॉ.श्रीकृष्ण जोशी यांनी केले.दत्तात्रय शिंदे आणि सुभाष गोरे यांनी डॉ.नरेंद्र वैद्य यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.व्याख्याना नंतर मोफत तपासणी शिबीर पार पडले.शिबिरात अनेक ठिकाणाहून आलेल्या व्यक्तींनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून आपली आरोग्य तपासणी करून घेतली.