मराठी शाळेत तातडीने शिक्षक नेमणे आणि मराठी शाळा इमारतीत इतर शाळा भरवू नये या मागणीचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे शुक्रवारी जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा पंचायत सी ई ओ व जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. सदर निवेदन जिल्हाधिकार्यांच्या सहायकांनी स्वीकारले निवेदनाचा स्वीकार करून त्यांनी जिल्हाधिकार्यांच्यावतीने योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. शहर व ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये मराठी शिक्षक नेमण्यात आलेले नाहीत किंवा शिक्षकांची सक्तीने बदली करण्यात आली आहे.
तालुक्यातील होन्निहाळ व शहरातील नानावाडी येथील प्राथमिक शाळेसह इतर बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासत आहे यासाठी संबंधित शाळांमध्ये कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणूक करावी. कन्नड शाळांमध्ये गळती वगैरे लागल्याचे कारण पुढे करून मराठी शाळा इमारतींमध्ये कन्नड शाळांचे स्थलांतर केले जात आहे. याला आमचा विरोध असून संबंधित शाळा लवकरात लवकर त्यांच्या स्वतःच्या जागी हलवाव्यात. आमच्या या मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, श्रीकांत कदम आदींसह पालक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.