शहरातील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचे थांबविले काम त्वरित पूर्ववत सुरु न केल्यास दिलेला ठेका रद्द करण्यात येईल,असा इशारा बेळगाव महापालिकेने मागडी (जि. रामनगर) येथील चेतक ऍनिमल वेल्फेअर या संस्थेला दिला आहे.
शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने गेल्या सहा महिन्यापूर्वी बेळगाव महापालिकेने मागडी (जि. रामनगर) येथील चेतक ऍनिमल वेल्फेअर या संस्थेला या कुत्र्यांच्या नसबंदीचा ठेका दिला होता. मात्र भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर या संस्थेने महिनाभरापूर्वी अचानक आपले काम थांबविले. परवानगीशिवाय भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचे काम थांबल्यामुळे महापालिकेने चेतक संस्थेला नसबंदीचे काम त्वरित सुरू करा अन्यथा कारवाई केली जाईल, असा नोटिशीद्वारे इशारा दिला होता. या नोटीसनंतरही संबंधित संस्थेने आपले काम सुरु न केल्यामुळे आता महापालिकेने दुसरी नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. चेतक संस्थेने जर या नोटीसची दखल घेतली नाही तर त्यांचा ठेका रद्द करून नव्याने निविदा काढून अन्य ठेकेदार नियुक्त केला जाणार आहे.
दरम्यान भटक्या कुत्र्यांवरील नसबंदीच्या शस्त्रक्रियेसाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने चेतक संस्थेने आपले काम थांबविल्याचे समजते. या संस्थेला महापालिकेने व्हॅक्सन डेपो येथील जागा नसबंदीच्या शस्त्रक्रियेसाठी उपलब्ध करून दिली होती. तथापि त्या ठिकाणच्या इमारतीच्या छताच्या गळतीचा फायदा घेत काही लोकांनी माहिती अधिकाराचा वापर करून चेतक संस्थेला त्रास देण्यास सुरुवात केली.
त्यामुळेच या संस्थेने आपले काम बंद केले असले तरी कारण देताना शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नसल्याचे सांगितले आहे. एकंदर महापालिकेकडे सध्या पर्यायी जागा उपलब्ध नसल्यामुळे चेतक संस्थेकडून पुन्हा नसबंदीचे काम सुरू होण्याची शक्यता मावळली असल्याचे बोलले जात आहे.