बेळगाव जिल्ह्यात विनापरवाना सुरू असलेल्या अनाधिकृत टीव्ही चॅनेल्स खासकरून यूट्यूब चॅनल्स विरूध्द कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱी बोमनहळ्ळी यांनी दिला आहे.
जिल्हाधिकार्यालयात बुधवारी झालेल्या केबल टेलिव्हीजन नेटवर्क पदाधिकाऱ्यांच्या जिल्हा पातळीवरील बैठकीत त्यांनी हा इशारा दिला. टीव्हीवरील सर्व चॅनल्सची टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथोरिटी ऑफ इंडियाकडे (टीआरएआय) रीतसर नोंदणी झाली पाहिजे टेलिव्हिजन चैनल्स सरकारी अधिकारी आणि अन्य लोकांना ब्लॅकमेल करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सध्या केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेगुलेशन्स) ॲक्ट 1995 नुसार परवानगी नसलेले थोडक्यात नोंदणी न झालेले बेकायदा यूट्यूब चॅनेल्स जिल्ह्यात सुरू आहेत.
न्यायालयासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार केबल ऑपरेटर्सनी ग्राहकांकडून एक निर्धारित शुल्क आकारावे. केबल ऑपरेटर्सनी ठरलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारल्यास ग्राहक त्याविरुद्ध तक्रार नोंदवू शकतो. सर्व केबल ऑपरेटर्स आणि एमएसओ यांनी 27 डीडी चॅनेल्स दाखविणे सक्तीचे आहे. याची अंमलबजावणी झाली नाही तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, यासंदर्भात देखरेख आणि तक्रारी नोंदवून घेण्यासाठी बेंगलोर येथे 24×7 कंट्रोल रूम स्थापण्यात आली आहे. याठिकाणी राज्यातील केबल आणि सॅटेलाइट टेलिव्हिजन चॅनेल्सवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांबाबतच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जातील. घरातील फोन, ई-मेल अथवा व्हॉट्सऍप या माध्यमातून नागरिकांना पुढील क्रमांकावर आपल्या तक्रारी नोंदविता येतील. कंट्रोल रूम क्रमांक : 080- 22028013 किंवा 0831- 2420344.