ई-क्षण या नव्या ऑनलाईन व्यवस्थेद्वारे आता आधार क्रमांकाच्या धर्तीवर विविध प्रमाणपत्रांसाठी विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहेत. यामुळे यापुढे तीन महिने, सहा महिने किंवा प्रत्येक वर्षाला जात, उत्पन्नाच्या किंवा रहिवासी दाखल्यासाठी अर्ज करावा लागणार नाही.
या नव्या ई-क्षण व्यवस्थेची जबाबदारी महसूल खात्याकडे सोपविण्यात आली असून अटलजी जनस्नेही संचालनालयातर्फे या व्यवस्थेचे कार्य चालू होणार आहे. रेशन कार्ड आणि आधार कार्डसाठी नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर प्रमाणपत्राचा विशिष्ट क्रमांक पाठवला जाणार आहे, हा क्रमांक जनस्नेही केंद्राच्या काऊंटरवर दाखविल्यास तेथून संबंधित प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
विशिष्ट क्रमांक मिळाला नसेल तर तहसीलदार कार्यालयात जाऊन केवळ रेशन कार्ड क्रमांक दाखवल्यास प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. याआधीच्या व्यवस्थेनुसार एकदा अर्ज केला की संबंधित प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एकवीस दिवस वाट पहावी लागते तथापि ई-क्षण या नव्या व्यवस्थेमुळे एक काम अल्पावधीत होणार आहे.
ई-क्षण व्यवस्थेसाठी शहर आणि ग्रामीण भागात तलाठी व वॉर्ड बिल कलेक्टर संयुक्तपणे प्रत्येक कुटुंबाची माहिती संग्रहित करणार आहेत.
प्रारंभी संबंधित वॉर्डातील रेशन दुकानातून आणि त्यानंतर घरोघरी जाऊन ही माहिती घेतली जाणार आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट आधार कार्ड मतदार ओळखपत्राची झेरॉक्स प्रत घेतली जाणार आहे. या व्यवस्थेचे ग्रामीण भागातील बहुतांश काम पूर्णत्वास आले आहे सध्या शहर परिसरात काम सुरू झाले असून काही दिवसात ते पूर्ण केले जाणार आहे.