कर्नल सी.के. नायडू चषक 23 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत हैदराबाद संघावरील कर्नाटक संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलताना उपकर्णधार बेळगावचा अष्टपैलू खेळाडू सुजय सातेरी याने शानदार शतकासह 172 धावांची खेळी साकारत सामनावीर पुरस्कार पटकाविला.
शिमोगा येथील के एल सी एस स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या सी के नायडू स्पर्धेच्या सामन्यात सुजय सातेरीच्या 172 धावांचा जोरावर कर्नाटक संघाने प्रतिस्पर्धी हैदराबाद संघावर तब्बल एक डाव आणि 66 धावांनी दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने 83.4 षटकात सर्वबाद 202 धावा काढल्या. त्यांच्या निखिल जयस्वालने 62 व एसएसआर चरणने 50 धावा झळकविले.
कर्नाटक संघाने पहिल्या डावात 151.4 षटकात 410 धावा काढल्या. एक वेळ कर्नाटक संघाची अवस्था 4 बाद 101 धावा अशी झाली होती. त्यावेळी मैदानात उतरलेल्या सुजय सातेरी याने संघाचा डाव चांगल्याप्रकारे सावरला. सुजयने किशन वोद्रला हाताशी धरून पाचव्या गड्यासाठी 94 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली, तसेच मनोज बांडगी यांच्या साथीने सहाव्या गड्यासाठी 45 धावांची भागीदारी केली. मनोज बांडगीने 24 धावा काढल्या. त्यानंतर सूजयने संतोक सिंगच्या साथीने 10व्या गड्यासाठी 44 धावांची भागीदारी केली. सुजय सातेरीने तब्बल दीड दिवस फलंदाजी करण्याचा पराक्रम केला त्याने 390 चेंडूमध्ये 16 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने 172 धावा झळकविल्या.
कर्नाटक संघातर्फे खेळण्याची सुजयची ही सहावी वेळ असून त्याची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी मध्ये दोन वेळा निवड झाली आहे. उपरोक्त शतकी खेळीबद्दल सुजय सातेरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.