बेळगाव जिल्ह्यात तीन जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आल्याने जिल्ह्यात आणखी एकदा भाजपने आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे.जिल्ह्यातील तीनही लढती चुरशीच्या असल्यामुळे राज्याचे लक्ष याकडे लागून राहिले होते.
गोकाकमध्ये भाजपचे रमेश जारकीहोळी यांनी आपले बंधू लखन जारकीहोळी आणि अशोक पुजारी यांना धूळ चारून गोकाकमध्ये पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले.गोकाकच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते.
काँग्रेस आमदार सतीश जारकोहोळी यांनी आपली ताकद लखन यांच्यामागे लावली होती.गोकाक मतदारसंघात ते तळ ठोकून प्रचार यंत्रणा राबवत होते.त्यांनी ही लढत प्रतिष्ठेची बनवली होती.वेगवेगळ्या प्रकारच्या व्यूह रचना त्यांनी केल्या होत्या पण शेवटी रमेश जारकीहोळी यांनी तेथे विजय मिळवला. प्रचाराच्यावेळी दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर झाले होते. रमेश हे गोकाक मधून पाचव्यांदा आमदार झाले आहेत या अगोदर त्यांनी चार वेळा काँग्रेस मधून विजय मिळवला होता.
अथणी मतदारसंघात महेश कुमठळ्ळी यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला.या मतदारसंघात काँग्रेसने आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला होता .दिग्गज नेत्यांची फौज प्रचारासाठी तैनात केली होती पण त्याचा उपयोग झाला नाही.महेश कुमठळ्ळी यांनी गाजावाजा न करता शांतपणे प्रचार यंत्रणा राबवली.आरोप प्रत्यारोपापासून दूर राहून त्यांनी योजनाबद्ध रीतीने प्रचार करून विजयश्री संपादन केली.
कागवाड मतदारसंघात भाजपचे श्रीमंत पाटील विजयी झाले.कागवाड मतदारसंघातील लढत काँग्रेसचे राजू कागे यांनी प्रतिष्ठेची बनवली होती.पण मतदारसंघात राजू कागे यांच्या विरोधात वातावरण होते.वीस वर्षांत विकासकामे काही केली नसल्यामुळे कागे यांना मतदारांनी पराभूत केले.
एकूणच बेळगाव जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सफल झाले असून तिन्ही ठिकाणी एकतर्फी विजय मिळवला आहे.
कागवाड मध्ये विजयी उमेदवार भाजपचे श्रीमंत पाटील यांना 76952 मते तर पराभूत काँग्रेसच्या राजू कागे यांना 58395 मते मिळाली. 18 हजारहून अधिक मताधिक्य मिळवत त्यांनी विजय संपादन केला.
गोकाक मध्ये रंगलेल्या तिरंगी लढतीत भाजपचे विजयी उमेदवार रमेश जारकीहोळी यांना 87450 मते तर काँग्रेसच्या लखन जारकीहोळी यांना 58444 व जे डी एस च्या अशोक पूजारी यांनी 27948 मते घेतली रमेश यांनी लखन यांचा तब्बल 29 हजार मताधिक्य मिळवत नमवलं.
अथणीत भाजपच्या महेश कुमठहळळी यांना 99203मते पडली तर काँग्रेसच्या गजानन मंगसुळी यांना 59214 मतें मिळाली-कुमठहळळी यांनी मंगसूळी यांचा40हजार मतांनी पराभव केला.