कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल) क्रिकेट स्पर्धेतील फिक्सिंगच्या घोटाळ्यात अडकलेल्या बेळगाव पॅंथर्स संघामुळे बेळगावच्या झळाळत्या क्रिकेट क्षेत्राला काळा डाग पडलाच आहे. फिक्सिंगच्या या घोटाळ्यानंतर आता बेळगाव परिसरातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंसमोर आणखीन एक समस्या उभी ठाकली आहे, ती म्हणजे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने (केएससीए) यंदाच्या बेळगाव जिल्हास्तरीय आयपीएल पद्धतीच्या क्रिकेट स्पर्धांना परवानगी नाकारली आहे.
कर्नाटकात बेंगळूरनंतर बेळगाव हे उदयोन्मुख क्रिकेटपटूंचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. बेळगाव शहरात सुमारे 8 क्रिकेट अकादमी असून या ठिकाणी शेकडो मुलं-मुली दररोज क्रिकेटचा सराव करतात. इंडियन प्रीमियर लीग आणि कर्नाटक प्रेमियर लीग क्रिकेट स्पर्धेनंतर देशात व कर्नाटकातही टी-20 पद्धतीचे झटपट क्रिकेट सुरू झाले. उदयोन्मुख होतकरू क्रिकेटपटूंना मोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर अशा टी-20 सारख्या झटपट क्रिकेट स्पर्धा भरविण्यात येऊ लागल्या. बेळगाव चॅम्पियन लीग (बीसीएल) आणि बेळगाव प्रीमियर लीग (बीपीएल) या दर वर्षाआड भरविल्या जाणाऱ्या स्पर्धा त्यापैकीच एक आहेत. भातकांडे स्पोर्ट्स अकादमी आणि युनियन जिमखाना लिमिटेडतर्फे या स्पर्धा वर्षाआड आयोजित केल्या जातात.
विविध आठ फ्रॅंचाईजीद्वारे जिल्ह्यातील सुमारे 150 उत्कृष्ट क्रिकेटपटूंना या स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळत असते. त्यांच्यासाठी केपीएल व आयपीएल सारख्या मोठ्या क्रिकेट स्पर्धांची दार उघडणारे हे जणू व्यासपीठच असते. मात्र आता बीसीएल व बीपीएल स्पर्धा रद्द करण्यात आल्यामुळे वर्षभर कसून सराव करणाऱ्या जिल्ह्यातील युवा होतकरू क्रिकेटपटूंचा तसेच आयोजकांचाही हिरमोड झाला आहे.
केपीएल फिक्सिंग घोटाळा उघडकीस आल्यानंतर ‘केएससीए’ने बीसीएल व बीपीएल या क्रिकेट स्पर्धांना परवानगी नाकारली असली तरी ‘केएससीए’च्या ए, बी, सी आणि डी डिव्हीजनल लेव्हल (विभागीय) क्रिकेट स्पर्धा यंदा घेतल्या जाणार आहेत.
दरम्यान, केएससीएचे धारवाड निमंत्रक अविनाश पोतदार यांनी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या धोरणात्मक निर्णयामुळे बीसीएल व बीपीएल या स्पर्धांना यंदा परवानगी नाकारण्यात आली आहे असे सांगितले. उदयोन्मुख होतकरू क्रिकेटपटूंना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळावी यासाठीच ‘केएससीए’तर्फे विभागीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा भरविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.