मदभावी (ता.अथणी) ग्रामपंचायत हद्दीतील आपल्या मालकीच्या 25 एकर जमिनीपैकी 15 एकर जमीन परस्पर लाटण्यात आल्याचे तक्रार वजा निवेदन शेतजमीन मालक सदाशिव घेरडे यांनी प्रादेशिक आयुक्तांसह जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडे सादर केले.
मदभावी ग्रा. पं. हद्दीतील सर्वे क्रमांक 623/2 मध्ये सदाशिव भाऊ घेरडे यांच्या मालकीची 25 एकर जमीन आहे. भूमाफियांनी या जमिनीपैकी 15 एकर जमीन अथणी तहसील कार्यालय व अन्य सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून परस्पर नावावर करून घेतली. 10 जानेवारी 2019 पर्यंत सातबारावर सदाशिव घेरडे यांचे नाव होते. परंतु आठ दिवसांनी 18 जानेवारी रोजी उतारा काढला, तेंव्हा त्यामध्ये चक्क रवींद्र कलगौडा पाटील व विजय कलगौडा पाटील (रा. तांवशी, ता.अथणी) यांची नावे सातबारा उताऱ्यावर असल्याचे आढळून आले. यासंदर्भात घेरडे यांनी अथणीतील संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही.
तेंव्हा सोमवारी सदाशिव घेरडे व त्यांची सून मनीषा घेरडे यांनी बेळगाव गाठून प्रादेशिक आयुक्त, जिल्हाधिकारी, एसीबी पोलीस प्रमुख व जिल्हा पोलीस प्रमुख यांना आपल्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात तक्रार वजा निवेदन सादर केले, तसेच न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
सदाशिव घेरडे यांनी आपल्या निवेदन वजा तक्रार अर्जात सर्कल ऑफिसमधील महसूल निरीक्षक, अथणी भूमापन कार्यालयातील एडीएलआर, सर्वेयर, तलाठी तसेच अन्य दोघा अनोळखी व्यक्तींच्या नावे आरोप केला आहे.
उतार वयामुळे फिरणे जमत नसल्याने सदाशिव घेरडे यांनी आपली सून मनीषा घेरडे हिला आपल्या मालकीच्या जमिनीचे वठमुखत्यार पत्र दिले आहे.