बेळगाव शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विकास कामांचे गाजर दाखवून अनेकांचा जीव घेणाऱ्या कंत्राटदारांना आता शिक्षा झालीच पाहिजे, असा सूर बेळगाव शहरातून उमटत आहे. अर्धवट टाकलेल्या कामांमुळे बेळगाव शहरातील दोघा जणांचा बळी गेला असून याबाबत प्रशासन गांभीर्य कधी घेणार? असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार करून अनेकांचे जीव घालवणार या स्मार्ट सिटी कामांचा विळखा घट होत चालला आहे. संथ गतीने सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी रस्त्यावरून चालायचे तरी कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. स्मार्ट सिटीचे कंत्राटदार तुपाची आणि नागरिक विकासापासून उपाशी अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचा गाजावाजा न करता विकासाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
मागील महिन्यात अशोकनगर येथील गटारी व रस्त्याचे काम सुरू असताना दुचाकीवरून पती-पत्नी जात होते. पत्नी दीपलक्ष्मी सोमदत्त नाईक वय 31 राहणार अशोकनगर हिचा मृत्यू झाला. रस्त्याचे काम अर्धवट ठेवण्यात न आल्याने दुचाकीवरून पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. तर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास दौलत दवले वय 55 राहणार अयोध्यानगर यांचा पोटात बारा घुसून मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दोन्ही घटना घडल्या असल्या तरी याकडे मनपाने आणि संबंधित स्मार्ट सिटीच्या कंत्राटदारांनी साफ दुर्लक्ष केले आहे. स्मार्ट सिटीच्या कामांमुळे दोघांचा मृत्यू झाला तरी प्रशासनाला आणखी किती बळी हवे आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बेळगाव शहराचा स्मार्ट सिटीत समावेश होऊन तब्बल दोन ते अडीच वर्षे उलटून गेले आहेत. मात्र विकासाच्या नावाने बोंबच आहे. याची साधीशी आणि पुसट शी कल्पनाही लोकप्रतिनिधींना नाही का? हा अंतर्मुख करणारा प्रश्न निर्माण होत आहे. विकासाचे गाजर दाखवून विकासाचे राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि संबंधित कंत्राटदारांचे साटेलोटे सुरू असल्याची माहितीही उघडकीस येत आहे. त्यामुळेच बेळगावच्या विकासाला राजकीय खिळ आणि भ्रष्टाचाराचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली भ्रष्टाचार करून माया जमावणाऱ्यानी अनेकांचे जीव घेण्यातच धन्यता मानले आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे यापुढे तरी स्मार्ट सिटीचे कामे तातडीने राबवून नागरिकांची सोय करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.