Tuesday, December 24, 2024

/

‘प्यासने जमिनींवर तयार केला तलाव’

 belgaum

बैलहोंगल तालुक्यातील बैलवाड येथे प्यासफाउंडेशनच्यावतीने पुनरुज्जीवीत करण्यात आलेला तलाव समारंभपूर्वक बैलवाड ग्रामस्थांकडे हस्तांतरित करण्यात आला. या कार्यक्रमाला विजापूर येथील ज्ञान मठाचे प पु सिद्धेश्वर स्वामीजी यांचे दिव्य सान्निध्य लाभले होते.
प्यास फाउंडेशनने बैलवाड या दुष्काळग्रस्त भागात 11 एकर कोरडवाहू आणि खडकाळ जमिनीवर निर्माण केला आहे. यासाठी प्यासच्या कार्यकर्त्यांनी दोन-अडीच महिने अथक परिश्रम घेण्यात आले आहे.

सिद्धबसवेश्वर या प्राचीन मंदिरामुळे विशेष ओळख असणारे हे गाव दुष्काळग्रस्त म्हणून परिचित होते. प्यास फाउंडेशनने याचा विचार करून या कोरडवाहू भागाला ओलिताखाली आणण्याचा निर्णय घेतला. पावसाळ्याआधी दोन – अडीच महिने 11 एकर जागेत डोंगर, दगड फोडून 20 लाख रुपये खर्चून छानसा तलाव निर्माण केला. पावसाळ्यात हा तलाव तुडुंब भरला आहे.

Pyas foundeshan
आजही तलावात काठापर्यंत पाणी असून या पाण्यामुळे परिसरातील हजारो एकर शेती ओलिताखाली येणार आहे. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. या तलावात जिवंत झरे लागले आहेत. परिसरातील अंतर्जल पातळी वाढल्याने आटलेल्या कुपनलिकेनांही भरपूर पाणी लागले आहे. प्यासच्या तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे बैलवाड ग्रामस्थांना लाभ झालेला आहे. बेळगाव परिसरातील अनेकांची तहान भागवणाऱ्या प्यासने जमिनीवर तलाव निर्माण करून बैलवाड परिसरात गावातील अनेक लोकांची तहान भागवली आहे.

शुक्रवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी प्यास फाउंडेशनने हा तलाव बैलवाड ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केला. विजयपूर येथील सिद्धेश्वर स्वामीजींनी कोनशीलेवरील पडदा हटवून तलाव हस्तांतरण कार्यक्रमाचे उदघाटन केले. यावेळी रेल्वे राज्यमंत्री, खासदार सुरेश अंगडी, आमदार महांतेश कौजलगी, पर्यावरणवादी शिवाजी कागणीकर यासह बैलवाड ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
प्यास फाउंडेशनच्यावतीने आजपर्यंत अरळीकट्टी, येळ्ळूर- सुळगे, प्रभुनगर, मच्छे, आमटे, भाविहाळ, कित्तूर अशा 8 तलावाना पुनरुज्जीवन देण्यात आले असून हा नववा तलाव आहे. याशिवाय अरगन तलाव सौदर्यीकरण आणि केळकर बाग, सरकारी शाळेनजीकच्या विहिरीला पुनरुज्जीवन देण्यातही प्यास चे योगदान आहे.

भूमीचे मोहन राघवन, डायमंड मेटल स्क्रीनचे किशोर बदानी यासह इतर दानशूरांच्या देणगीतून बैलवाड तलाव निर्माण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी प्यास फाउंडेशनचे अध्यक्ष माधव प्रभू, उपाध्यक्ष अभिमन्यू दागा, सचिव प्रीती कोरे- दोडवाड, उपसचिव अवधूत सामंत, संचालक सतीश लाड, सुर्यकांत हिंडलगेकर, तेजस कोळेकर, विनय बागी, आदित्य भिंगे, अशोक गोरे यासह अन्य सदस्य उपस्थित होते. सिद्धेश्वर स्वामीजी, खासदार सुरेश अंगडी यांनी प्यासच्या उपक्रमाचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.