कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.त्याला कारण आहे कर्नाटकात होत असलेली पोट निवडणूक .कागवाडचे माजी आमदार राजू कागे यांनी भाजपला रामराम करून काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.2018 च्या विधानसभा निवडणुकीत कागवाड मधून राजू कागे आणि गोकाकमधून अशोक पुजारी हे पराभूत झाले होते.
आता होत असलेल्या पोटनिवडणुकीत तिकीट दिले जाणार नाही म्हणून राजू कागे यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतलाय.अशोक पुजारी यांचे देखील तळ्यात मळ्यात सुरू आहे.त्यामुळे जिल्ह्यात भाजपचा दबदबा टिकवण्यात लक्ष्मण सवदी याना अपयश आल्याचे दिसत आहे.त्यामुळे सवदी यांना आगामी काळात अग्नी परीक्षेला तोंड द्यावे लागणार आहे.
काँग्रेस नाराज आणि पराभूत भाजप नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी उत्सुक आहे.ही नाराज मंडळी काँग्रेसमधे आली तर त्यांना तिकीट देण्याचे आमिष देखील दाखविण्यात येत आहे.मतदारसंघात प्रभाव असलेल्या नाराजाना प्रवेश दिला तर त्याची मदत काँग्रेसला जागा वाढण्यात होईल अशी आशा काँग्रेसला वाटते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देखील सवदी यांनी प्रचार केलेल्या सीमेलगतच्या अनेक जागांवर भाजप पराभूत झाला होता त्यावेळी देखील सवदी यांच्यावर टीका झाली होती.